सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नका : राज ठाकरे

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळी निमित्त काढलेल्या पाचव्या व्यंगचित्रातून राज्यातील युती सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नका, असं आवाहनच राज यांनी व्यंगचित्रातून बळीराजाला केलं आहे.

आपल्या चारही व्यंगचित्रातून भाजपवर शरसंधान साधणाऱ्या राज ठाकरे यांनी आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे. राज यांनी पाडव्या (बलिप्रतिपदा) निमित्त काढलेल्या या व्यंगचित्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना साडी नेसलेले दाखवले आहे. त्यांच्या हातात ओवाळणीचे ताट असून शेतकऱ्याच्या घरात हे दोघेही ओवाळायला आले आहेत. बळीराजा पाटावर बसला असून त्याची अर्धांगिणी त्याला म्हणते, ‘ऐका, आत्ताच सांगून ठेवते! एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा!’

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून शेतकऱ्यांना आश्वासनं देण्याचा शिवसेना-भाजपनं सपाटा लावला आहे. त्यापार्श्वभूमीवर युती सरकारच्या आश्वासनांना बळी न पडता त्यांना ओवाळणी अर्थात मतदान करू नका, असं सांगण्याचा प्रयत्न राज यांनी या व्यंगचित्रातून केलेला दिसतोय. राज यांनी हे व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलं आहे. राज यांचं हे व्यंगचित्र सेना-भाजपला झोंबण्याची चिन्हे आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत