सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत सातवा वेतन आयोग

नागपूर :रायगड माझा वृत्त

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत सातवा वेतन आयोग देण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे. यासाठी आर्थिक नियोजन केले जात असून सरकारच्या तिजोरीवर 21 हजार 530 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांना लाभ दिले जाणार असून अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वेतन आयोग पूर्वानुलक्षी प्रभावाने लागू करताना थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जमा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वेतन आयोगामुळे राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज झाल्याचा विरोधी पक्षाचा दावा चुकीचा आहे. मार्च 19 अखेर राज्यावरील बोजा 4 लाख 61 हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. राज्याच्या सकल उत्पन्नावर कर्जाचा बोजा मोजला जातो. आपल्याला सकल उत्पन्नाच्या 25 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज काढण्याची मुभा आहे. आजवरचे राज्यावरील कर्जाचे प्रमाण सकल उत्पन्नाच्या 16.5 टक्के एवढे आहे.
महसुली खर्च कमी करण्यास यश
जीएसटीमुळे राज्याचे उत्पन्न वाढले असून एप्रिल ते जून 2017 या काळात 25 हजार 742 कोटी रुपये मिळाले. जीएसटीनंतर या काळात 35 हजार 915 कोटी रुपये मिळाले. ही 35.52 टक्के वाढ आहे. महसूल वाढत असताना महसुली खर्च 50 टक्‍क्‍यांवरून 45 टक्‍क्‍यांवर आणण्यात सरकारला यश आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत