सरकारी बँका पाच दिवस बंद

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

साप्ताहिक सुट्ट्या, सार्वजनिक सुट्टी व कर्मचारी-अधिकाऱ्यांचा संप यामुळे सरकारी बँकांचे कामकाज आज, शुक्रवारपासून (सोमवारचा अपवाद वगळता) सलग पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. आज, शुक्रवारी अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाने प्रदीर्घ वेतन सुधार मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारला आहे. तर, २६ तारखेला बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना संपावर जाणार आहेत. यामुळे बँक व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे.

अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाने आज, शुक्रवारी संपाची हाक दिली आहे. यामुळे बँका बंद राहण्याची शक्यता नसली तरी त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार आहे. यानंतर २२ व २३ डिसेंबरला अनुक्रमे चौथा शनिवार व रविवार असल्याने बँका बंद असतील. सोमवारी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू राहील. २५ तारखेला नाताळनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने पुन्हा बँकांचे दार बंद राहील. आघाडीच्या नऊ बँकांच्या कर्मचारी संघटनेची शीर्ष संघटना असणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने नाताळला जोडून २६ तारखेला संप पुकारल्याने बुधवारीही कामकाजाला फटका बसेल. या संघटनेनेही वेतनासंबंधी मागण्या पुढे करून संपाची हाक दिली आहे.

बँकांकडून सूचना
या सलग सुट्ट्यांविषयी बहुतांश बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे. बँकांचे व्यवहार हे प्रत्यक्ष शाखांच्या बरोबरच एटीएम, मोबाइल अॅप, नेटबँकिंग आदी माध्यमांतूनही होत असल्याने ग्राहकसेवेवर फार परिणाम होणार नाही, असे बँकांचे म्हणणे आहे.

सुट्टीचे वेळापत्रक
२१ डिसेंबर – बँक अधिकाऱ्यांचा संप
२२, २३ डिसेंबर – चौथा शनिवार व रविवार
२४ डिसेंबर – नियमित कामकाज
२५ डिसेंबर – नाताळची सुट्टी
२६ डिसेंबर – बँक कर्मचारी संघटनेचा संप

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत