सरदार सरोवरातून महाराष्ट्राला थेंबभरही पाणी नाही

मेधा पाटकर यांची टीका

नर्मदा सरदार सरोवरातील पाण्याचा उपयोग केवळ गुजरातमधील धनाढय़ शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला होणार असून त्यातून महाराष्ट्राला एक थेंबही पाणी मिळणार नाही. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर या सरोवराचे उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ विकासाचा देखावा निर्माण करीत आहेत, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां आणि नर्मदा आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांनी केली.

यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी येथे जैताई पुरस्काराने मेधा पाटकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तेथे जाण्यासाठी बुधवारी त्या नागपूर येथे आल्या होत्या. म्यूर मेमोरियलमध्ये सकाळी शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरदार सरोवर प्रकल्पाचे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या प्रकल्पामुळे ४१ हजार प्रकल्पग्रस्त बेघर झाले असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने कुठलेही धोरण निश्चित केले नाही. केवळ घोषणा आणि आश्वासन देऊन उपयोग नाही. गुजरातमध्ये विकासाची गंगा आणल्याचा प्रचार केला जात असला तरी होणारा विकास केवळ तेथील उद्योगपती आणि उद्योगधार्जिणा आहे. नर्मदा सरोवरातील पाण्याचा गुजरातसह महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला फायदा होईल, असे सांगितले जाते. मात्र, महाराष्ट्राला या प्रकल्पातून एक थेंबही पाणी मिळणार नाही. केवळ २७ टक्के वीज मिळेल. मुख्यमंत्र्यांना याची माहिती आहे. मात्र, ते याबाबत काहीही बोलत नाहीत. या सरोवराचा पर्यावरणीय अभ्यास न करता बंधारे बांधले जात असून त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे मेधा पाटकर म्हणाल्या.

गुजरातमधील कोकाकोला कंपनीली दररोज ३० लाख लिटर आणि अदानींच्या उद्योगांना ६० लाख लिटर पाणी देण्यात येणार आहे. याशिवाय आणखी काही उद्योगांना पाणी देण्याची योजना आहे. ६० टक्के उद्योग क्षेत्राच्या फायद्यासाठी या सरोवराचे लोकार्पण करण्यात आल्याचा आरोप पाटकर यांनी केला. या विरोधात आम्ही संघर्ष करीत आहोत. शेतक ऱ्यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नदीजोड प्रकल्पाचे अजूनही नियोजन नाही. ५ लाख ६० हजार कोटी त्यासाठी तरतूद करण्यात आली होती. आज १० लाख कोटींच्यावर गेली आहे. गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा या शहरांना पाणी मिळत असले तरी छोटय़ा गावांमध्ये आजही दुष्काळ आहे.

जग्गी वासुदेव ढोंगी

नदी संरक्षणाचा प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करणारे जग्गी वासुदेव हे ढोंगी आहेत. रामरहिम बाबानंतर जग्गी वासुदेव यांच्या प्रकरणाची लवकरच पोलखोल केली जाईल. सध्या ते कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेवर आहेत. त्यांची यात्रा ही प्रायोजित असून त्यामागे काही उद्योगपती आहे. त्याच्या करारनाम्याचे पुरावे गोळा केले जात असून लवकरच ते लोकांसमोर आणले जाईल, असा दावाही मेधा पाटकर यांनी केला. गंगाशुद्धीकरण आणि नद्या जोडणी प्रकल्पाचे काम केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडून काढून नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आले आहे. गडकरी यांनी प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत