सर्वोच्च न्यायालयाची व्हॉट्स अॅपला नोटीस

रायगड माझा वृत्त :

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवारी) व्हॉट्स अॅपला फटकारलं आणि नोटीस जारी करुन अद्याप भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक का करण्यात आलेली नाही याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. व्हॉट्स अॅपसोबतच संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व अर्थमंत्रालयालाही ही नोटीस पाठवण्यात आली असून नोटिशीला उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

गेल्या आठवड्यात व्हॉट्स अॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी  केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली होती. या भेटीत भारतात व्हॉट्स अॅपचे कार्यालय सुरु करावे, भारतात तक्रार निवारणासाठी अधिकारी नेमावेत तसेच भारतीय कायद्याचे पालन करावे या तीन मुख्य सूचना भारत सरकारने केल्या होत्या. गेल्या काही महिन्यांमध्ये व्हॉट्स अॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्स अॅपला तंबी दिल्यानंतर ही भेट झाली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत