सर्व रस्ते नागपूरला जोडून स्वतंत्र विदर्भाचे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी

परभणी: रायगड माझा 

नागपूरला जोडणारे रेल्वेमार्ग, रस्ते आदी कामांतून विदर्भाचा विकास करताना संपूर्ण महाराष्ट्राचा पैसा घेऊन स्वतंत्र विदर्भाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची ही पायाभरणी सुरू झाली आहे. महाराष्ट्राला तोडण्याचे काम राज्यातील भाजप सरकार करीत असून हे सरकार महाराष्ट्र द्रोही आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सोमवारी(दि.२३) येथे पत्रकार परिषदेत केला.

मनसेच्या मराठवाडा पक्ष बांधणीच्या दृष्टीने सोमवारी ठाकरे यांचे शहरात आगमन झाल्यानंतर सावली विश्रामगृहावर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. या वेळी बोलताना ठाकरे यांनी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर आजवर मुख्यमंत्री झालेले असताना मराठवाड्याचा विकास काहीच झाला नाही. जे व्हायला पाहिजे होते, ती विकास कामे ही मंडळी करू शकली नाही. परिणामी मराठवाडा विकासापासून दूरच राहिल्याचे चित्र दिसून येते. जागोजागी असलेल्या खड्डेमय रस्त्यांतून याची प्रचिती येत असल्याचे ठाकरे म्हणाले.

थापा मारणारे मुख्यमंत्री
राज ठाकरे म्हणाले, राजकीय कारकीर्दीत सध्याच्या मुख्यमंत्र्यांसारखे थापा मारणारे मुख्यमंत्रीच पाहिले नाहीत. कदाचित विठ्ठलानेच त्यांना तुमचे दर्शन नको असल्याचे संकेत दिले असावेत, असेही ठाकरे म्हणाले. केंद्रात व राज्यातील सरकार नाही त्या गोष्टींमध्ये व योजनांमध्ये वेळ वाया घालवत आहे. सर्रास खोटे बोलण्याचे काम हे सरकार करीत असून राज्यातील एकही रस्ता चांगला नसताना नागपूरला सर्व मार्ग जोडण्याचे कारस्थान म्हणजे स्वतंत्र विदर्भाचे स्वप्न पूर्ण करण्याची पायाभरणीच होय.

सरकारी नोकऱ्या आहेत कुठे?
मराठा आरक्षणावर ठाकरे म्हणाले, आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीसाठीच मागितले जाते. परंतु सध्या ९५ टक्के उद्योगधंदे आणि शिक्षण संस्थाही खासगीच आहेत. खासगीत आरक्षण कुठून मिळणार व सरकारी नोकऱ्या राहिल्यातच कुठे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शिवसेना गाेंधळलेलीच
नाणार प्रकल्प होऊ देणार नसल्याची शिवसेनेची भूमिका असताना ती सत्तेतून बाहेरही पडत नाही. शिवसेना गोंधळलेल्या अवस्थेत असून तिला रस्ता सापडत नाही, असाही आरोप ठाकरे यांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत