सव्वा दोन वर्षांनंतर समीर भुजबळ यांचा जामीन मंजूर

मुंबई : रायगड माझा

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर त्याच धर्तीवर आपल्याला जामीन द्यावा, यासाठी समीर भुजबळांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणात कमाल सात वर्षांची शिक्षा असून समीर भुजबळ यांनी यापूर्वीच त्यापैकी एक तृतीयांश कालावधी जेलमध्ये काढला आहे, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करत आहोत, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने समीर भुजबळ यांना फेब्रुवारी 2016 मध्ये अटक केली होती. जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त काळानंतर समीर भुजबळ तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

दरम्यान, याआधी उच्च न्यायालयाने छगन भुजबळ यांनाही जामीन मंजूर केला होता. त्यानंतर समीर भुजबळ यांनी जामिनासाठी धाव घेतली, मात्र त्यांचा मुक्काम वाढतच होता. सुट्टीकालीन न्यायालयातही त्यांच्या जामिनावर सुनावणी करण्यात आली. मात्र विविध कारणांनी ही सुनावणी पुढे ढकलत होती.

नोव्हेंबर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील कलम 45 घटनात्मकदृष्ट्या अवैध ठरवलं होतं. त्याच धर्तीवर छगन भुजबळ यांनी जामीन अर्ज केला आणि तो मंजूर करण्यात आला. तसाच जामीन अर्ज समीर यांनी देखील केला. मात्र पीएमएलए कायद्यात 29 मार्च रोजी पुन्हा नव्याने दुरुस्ती करण्यात आली असून त्यामुळे आता समीर यांना जामीन देता येणार नाही, असा ईडीचा युक्तीवाद होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत