सांगलीत बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉक्टर पतीलाही अटक

सांगली : रायगड माझा वृत्त 

गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा महिलांचा गर्भपात करुन भ्रूणांची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी डॉ. विजयकुमार शामराव चौगुले (वय ४५, रा. सिद्धिविनायक नक्षत्र अपार्टमेंट, विश्रामबाग) याला मंगळवारी (18 सप्टेंबर) सकाळी अटक करण्यात आली आहे. पत्नी डॉ. रुपाली चौगुलेस अटक होताच तो पोलिसांना शरण आला. मात्र त्याचा मेहूणा डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे हा अजूनही फरारी आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत.

sangli hospital illegal abortion racket busted chougule hospital dr vijaykumar chougule arrested | सांगलीत बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉक्टर पतीलाही अटक 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने चार दिवसापूर्वी चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकून बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले होते. याप्रकरणी चौगुले दाम्पत्यासह डॉ. स्वप्नील जमदाडे याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रुग्णालयावर टाकलेल्या छाप्यात गर्भपाताची किटस्, औषधी गोळ्या, इंजक्शनचा साठा जप्त केला होता. गर्भपात केलेल्या महिलांचे केस पेपर व तसेच आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली होती. आतापर्यंतच्या तपासात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ महिलांचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी डॉ. रुपाली चौगुले हिला अटक केली आहे. सध्या ती पोलीस कोठडीत आहे. पत्नीला अटक झाल्याचे समजताच डॉ. विजयकुमार चौगुले मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. त्याला अटक करुन न्यायालयात उभे करण्यात आले आहे.

गर्भपात केलेल्या नऊ महिलांची नावे व पत्त्यावरुन त्यांचा शोध घेण्यात आला आहे. या महिलांचे जबाब घेण्यासाठी पोलिसांचे चार पथके सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात रवाना केली आहेत. या महिलांनी गर्भपात कधी केला? गर्भपात करण्यामागे काय कारण होते? त्यांना गर्भपातासाठी चौगुले हॉस्पिटलमध्ये कोणी पाठविले? सोनोग्राफी तपासणी कुठे केली? या सर्व बाबींचा उलघडा जबाबातून केला जाणार आहे. याशिवाय संबंधित महिलांच्या पतींनाही चौकशीसाठी बोलवले जाणार आहे. दरम्यान अटकेतील चौगुले दाम्पत्याची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून त्यांनी आतापर्यंत किती महिलांचे गर्भपात केले? गर्भपातासाठी लागणारी औषधे कोठून आणत होते? याचा प्रथम उलघडा केला जाईल, असे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांकडे चौकशी

रुग्णालयात दोन महिला व एक पुरुष, असे तीनच कर्मचारी आहेत. त्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्याआधारे पुढील तपासाला दिशा देण्यात आली आहे. गर्भपात करण्यासाठी या महिला कोणाच्या माध्यमातून येत होत्या? यासाठी चौगुले दाम्पत्य किती पैसे घेत होते? याविषयी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. त्यांचा यामध्ये कितपत सहभाग आहे, हे पाहून पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत