साईटपट्टी नसल्याने अपघात, दुचाकीस्वाराचा बळी तर चिमुरडी गंभीर जखमी

माणगांव :प्रवीण गोरेगांवकर

            मुंबई गोवा महामार्गावर रेपोली फाटा, ता. माणगांव येथे मागुन येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करतांना ट्रकच्या मागील बाजूस लागून टायरखाली आल्याने मोटारसायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सोबत प्रवास करणारी त्यांची लहान मुलगी ही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

            प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार माणगांव तालुक्यातील रेपोली फाटा येथे कविलवहाळ येथील शिवसेना शाखाप्रमुख दिपक निमण () रा. कविलवहाळ हे आपली मुलगी उज्वला दिपक निमण (9) हिला घेऊन आपल्या ताब्यातील स्कुटी क्रमांक एम.एच. 06, बी.एल. 2876 ने माणगांववरून लोणेरेकडे जात असतांना मागुन आलेल्या ट्रक क्रमांक एम.एच 04, जी.सी. 7677 ने त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून आलेल्या वाहनाला साईड देतांना ट्रकची मागील बाजू कै. दिपक निमण यांना लागली. रस्त्याचे काम सुरु असल्याने साईडपट्टीला जागा नसल्याने त्यांना ट्रकचा धक्का लागून ते थेट मागील टायरखाली आले व मुलगी बाजूला फेकली गेली. हा अपघात एवढा भीषण होता की, मयत दिपक निमण यांच्या डोक्यावरून टायर गेल्याने डोके फुटून मेंदूच बाहेर आला होता तर मुलगी गंभीर जखमी होऊन बाजूला पडली होती. गोरेगांव पोलिसठाण्याला अपघाताची माहीती मिळताच पो.ह. पांडुरंग सानप, अक्षय जाधव व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले व जखमी उज्वलाला माणगांव उपजिल्हारुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठवून दिले. उज्वला हि गंभीर जखमी असल्याने तिच्यावर प्रथमोपचार करून तिला तातडीने मुंबई येते पुढील उपचारासाठी पाठवून देण्यात आले आहे. गोरेगांव पोलिसठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पो. नि. अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

            दरम्यान श्री. दिपक निमण हे शिवसेनेचे कविलवहाळ लोकप्रिय शाखाप्रमुख होते. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजताच माणगांव पंचायत समिती सभापती राजेश पानवकर, तालुकाप्रमुख अनिल नवगणे, रा.जि.प. सदस्या अमृता हरवंडकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे आदींनी दवाखान्यात धाव घेत कुटूंबियांचे सात्वन केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत