साखरपुडा मोडून किडनी देऊन मुलीने वाचवले आईचे प्राण

बेंगळुरू: रायगड माझा वृत्त 

बेंगळुरूच्या ओल्ड एअरपोर्ट रोडवरील मणिपाल हॉस्पिटलमध्ये एका तरुणीनं आईला किडनी दान देऊन तिचे प्राण वाचवले. आईला किडनी देण्यास होणाऱ्या पतीनं विरोध केला होता. त्यामुळं या मुलीनं साखरपुडाच मोडला. किडनी प्रत्यारोपणानंतर डॉक्टरांना ही बाब समजली. त्यांनी या मुलीचं कौतुक केलं.

किडनी दान करणाऱ्या महिलांची संख्या खूप कमी आहे. पती आणि सासरची मंडळी विवाहितांना किडनी दान करू देत नाहीत. ज्या आईनं स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन लहानाचं मोठं केलं, त्या आईसाठी मुलं जीव ओवाळूनही टाकायला तयार होतात. अशीच एक घटना बेंगळुरू शहरात घडलीय. एका पंचवीस वर्षीय तरुणीनं किडनी देऊन तिच्या आईचे प्राण वाचवले. किडनी दान करण्यास होणाऱ्या पतीनं विरोध केला म्हणून तिनं भविष्याचा विचार न करता चक्क साखरपुडा मोडला.

‘मी सहसा अविवाहित मुलींना अवयवदान करण्यापासून परावृत्त करतो. कारण त्यांच्यासमोर अख्खं आयुष्य पडलेलं असतं. पण या मुलीनं विनंती केल्यानं शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, दोघींची प्रकृती ठीक आहे,’ असं डॉक्टर शंकरन सुंदर यांनी सांगितलं.  बांगलादेशातील या तरुणीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, असं डॉक्टर म्हणाले. ‘मी खूप नशिबवान आहे की माझ्या घरात अशी मुलगी जन्माला आली. आईला किडनी देण्यास होणाऱ्या पतीनं विरोध केला. पण आईचा जीव वाचवण्यासाठी तिनं साखरपुडा मोडला, असं सांगतानाच वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत