सातारा: अतिक्रमणधारकांना राहिली नाही कारवाईची धास्ती

पालिकेकडून फक्त मोहिमांवर मोहिमा

 

सातारा : रायगड माझा

गेल्या काही महिन्यांपूर्वीच शहरातील अतिक्रमणांवर पालिकेकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा ही अतिक्रमणे “जैसे थे’ दिसू लागल्याने “तू कर मारल्यागत, मी करतो रडल्यागत’ अशीच काहीशी नौटंकी करुन पालिका आणि व्यावसायिकांकडून शहरतील नागरिकांची दिशाभूल सुरु आहे की काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अतिक्रमण मोहिमा आणि पुन्हा त्याच ठिकाणी होणारी अतिक्रमणे यामुळे पालिकेच्या कारभारावरही संशय व्यक्त होऊ लागला आहे.

राज्यात कोणत्याही शहरात जितक्‍या वेळा अतिक्रमण हटाव मोहिमा झाल्या नसतील तितक्‍या अतिक्रमण हटाव मोहिमा सातारा शहरात झाल्या असाव्यात. नुकतील गेल्या काही महिन्यांपूर्वी पालिकेने पोलीस फौजफाटा बरोबर घेऊन शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा हातोडा मारला होता. पालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाहीत याविषयी त्यांना शंकाही होतीच. आणि सध्याची शहरातील परिस्थिती पाहता नागरिकांची शंकाही रास्तच होती हे दिसून येत आहे. कारण, काही काळासाठी मोकळा श्‍वास घेतलेल्या सातारा शहरातील रस्त्यांवरील फुटपाथवर आता पुन्हा अतिक्रमणांनी डोकी वर काढत आपले व्यावसाय थाटले आहेत. दरम्यान, बसस्थानकापासून पोवईनाक्‍याकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या फुटपाथवर विक्रेत्यांनी पुन्हा आपली दुकाने थाटल्याने “व्यावसायिक फुटपाथवर अन्‌ नागरिक रस्त्यावर’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील राधिका रोड, तसे राजपथावरुन पालिकेच्या दारावरुन राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील फुटपाथवरही पुन्हा अतिक्रमणे बोकाळली आहेत.

 

 

पाठबळ कुणाचं?

वारंवार कारवाई होत असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करण्याचे धाडस संबंधित अतिक्रमणधारकाकडून होत आहे. व्यावसायिकांच्या मुजोर धाडसाला नेमकं कुणाचं पाठबळ मिळतयं? का आर्थिक संबंधांमुळेच या अतिक्रमणधारकांना प्रशासनाची धास्ती राहिलेली नाही की काय? असा सवाल सातारकर नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला असून नेमकी कुणाच्या जिवावर ही मिजास सुरु आहे? अशा संतप्त प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत

पालिकेच्या कारभारावर संशय
अतिक्रमणाविषयी बोंब सुरु झाली की पालिकेची कारवाईची मोहिम सुरु होते. मात्र, पुन्हा त्याच व्यावसायिकांकडून त्याच ठिकाणी अतिक्रमणे होतात. अतिक्रमणे झाल्यानंतर हा प्रकार पालिकेला समजत नाही का? की समजूनही दुर्लक्ष केले जाते? प्रत्येकवेळी प्रशासन तक्रारींचीच वाट पाहणार का? असे अनेक प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित केले जात असतानाच पालिकेच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत