सातारा कारागृह ‘हाऊसफुल’

सातारा : रायगड माझा 

 जिल्हा कारागृहातील कैद्यांची क्षमता 167 इतकी असताना सध्या 454 कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनाला दररोजच कसरत करावी लागत आहे. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे प्रशासनावरील ताण थोडासा कमी झाला असला तरी क्षमतेपेक्षा पाचपट कैदी असल्याने प्रशासनाची मोठी दमछाक होताना दिसत आहे.

कारागृहात वाढलेली विविध गुन्ह्यातील कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने प्रशासनावर खुप ताण पडत असल्याने न्यायालयाची परवानगी घेऊन कैदी इतर कारागृहात वर्ग करण्याचे काम सुरु आहे.
प्रदीप जगताप, प्र.अधिक्षक जिल्हा कारागृह.

कारागृहात न्यायालयीन बंदी आणि तीन महिन्यांपर्यंत किरकोळ शिक्षा झालेल्या संशयीताना ठेवले जाते.गेल्या पाच-सहा वर्षांत जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढल्यामुळे विविध गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिस कोठडीनंतर जामीन मंजूर होईपर्यंत कारागृहात मुक्कामी असतात.तसेच अलीकडच्या काळात संशयित आरोपींच्या जामिनावर पोलिसांचे लक्ष केंद्रित होत असल्याने जामिनासाठी कोणी अर्ज केला, की तत्काळ पोलिस अधिकारी म्हणणे सादर करून जामीन नाकारण्यास न्यायालयाला विनंती करतात. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

जिल्हा कारागृहातील पुरुष आणि स्त्री कैदी मिळून 167 इतकी क्षमता आहे.परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून चारशेच्या आसपास ही संख्या असते. पाच-दहा जणांना जामीन मिळाला की अन्य गुन्ह्यात तेवढेच संशयित कारागृहात येतात. त्यामुळे कारागृहातील फलकावरील कैद्यांची संख्या सतत साडेचारशेच्या खाली आणि वर हलताना दिसते.आठवड्यापूर्वी 406 इतकी कैद्यांची संख्या होती. सध्या 454 इतकी संख्या आहे. यापैकी सुमारे दोनशे कैदी गंभीर गुन्ह्यातील आहेत.

क्षमतेपेक्षा ते कैदी कारागृहात असल्यामुळे अपुऱ्या संख्याबळावर त्यांच्यावर सतत नियंत्रण ठेवताना प्रशासनाला अडचणी निर्माण होत आहेत. कैद्यांच्यात आपआपसात भांडणे होऊ नयेत यापासून ते त्यांचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सतत प्रयत्नशील राहावे लागते. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कैद्यावर सतत नजर असल्यामुळे प्रशासनाचा ताण थोडासा कमी झाला असला तरीही कैद्यांची आणि कारागृहाची सुरक्षा पार पाडताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसुन येते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत