सातारा-जावळीतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

आ.शिवेंद्रसिंहराजे: जिल्हा बॅंकेतर्फे मदतीसाठी प्रयत्न

रायगड माझा वृत्त 

सातारा: जावली व सातारा तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पाहणी अहवाल पाठवून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह दोन्ही तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मागणीचे निवेदन सादर केले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी जावली पंचायत समिती सभापती अरूणा शिर्के, सातारा पंचायत समिती सभापती मिलींद कदम, सौरभ शिंदे, जि.प.सदस्य अर्चना रांजणे, प्रतीक कदम, मधू कांबळे आदी.उपस्थित होते.

दोन्ही तालुके डोंगराळ असून पश्‍चिम भागात पावसाचे प्रमाण मोठे आहे. यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने घरे, शाळा व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने भात, नाचणी, भुईमुग, ज्वारी, वरी व कारळा पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुर्णत: हवालदिल झाला असून शासनाने त्यांना निकषात न अडकवता तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. लवकरच मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांची भेट घेवून मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. असे ही ते म्हणाले. दोन्ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांना नुकसानीचा प्रथम अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याच्या पुर्वेकडे दुष्काळ पडल्यानंतर व वॉटरकप स्पर्धेसाठी जिल्हा बॅंकेने मदत केली होती. आता सातारा व जावली तालुक्‍यात ओला दुष्काळ निर्माण झाला असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना बॅंकेकडून मदत मिळावी यासाठी येत्या बैठकीत निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

 म्हणून टोलच्या विरोधात आंदोलन नाही
महामार्गाच्या दूरवस्थे बाबत राष्ट्रवादीने ठाण्यात जोरदार आंदोलन केले त्याच पुणे-सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे पत्रकारांनी आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या निर्दशनास आणून दिले. त्यावर आ.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, यापुर्वी आम्ही टोलच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावेळी आमच्यावरच 307 कलमांअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे आंदोलन वैगेरे काही करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत