सातार्‍यातही हॅकरने तब्बल 37 लाख रुपये लांबवले

सातारा : रायगड माझा वृत्त 

मोबाईलवर आलेल्या एका मेसेजच्या नंबरवर फोन लावताच कंपनीचे चक्क 37 लाख 78 हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याची खळबळजनक घटना घडली आहेे. ही कंपनी मोळाचा ओढा येथे असून कंपनीच्या मॅनेजरला मोबाईलवर मेसेज आला होता. त्यानंतर त्याने फोन केल्यावर ही घटना घडली आहे. हॅकरच्या माध्यमातून मोबाईल स्वाईपद्वारे हे पैसे चोरी झाले असल्याचे निष्पन्नझाले आहे.
याबाबत विलास मारुती सोनमळे (वय 63, रा.पांढरवाडी, कोडोली, सातारा) यांनी  तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोळाचा ओढा येथे अभिजित इक्विपमेंट व अभिजित इंजिनिअर्स या नावाच्या दोन कंपन्या आहेत. सचिन दोशी हे या कंपनीचे मालक आहेत. तक्रारदार विलास सोनमळे हे गेल्या काही वर्षापासून या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. कंपनीकडून सर्वांना एकाच कंपनीचे सिम कार्ड देण्यात आले असून त्यावर बँकिंग ट्रँझेक्शनही केले जाते.

दि. 12 रोजी मॅनेजर विलास सोनमळे हे ऑफिसमध्ये काम करत होते. यावेळी त्यांच्या मोबाईवर एक मेसेज आला. मोबाईलवरील तो मेसेज वाचल्यानंतर त्यावर एक क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर फोन लावला व त्यानुसार पुढील प्रक्रिया केली. दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि. 13 रोजी बँकेतील पदाधिकार्‍याचा मॅनेजर यांना फोन आला व बँकेतून मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र मॅनेजर यांनी कोणताही व्यवहार केला नसल्याचे सांगितले. त्यावर कंपनीचे मॅनेजर तत्काळ बँकेत गेले त्यांनी सर्व ट्रँझेक्शन पाहिले. एका कंपनीवरून 25 लाख तर दुसर्‍या कंपनीवरून 12 लाख 78 हजार रुपये असे एकूण 37 लाख 78 हजार रुपये त्रयस्थाच्या खात्यावर जमा झाले असल्याचे निदर्शनास आले. या सर्व प्रकारामुळे मॅनेजर गोंधळून गेले व त्यांनी कंपनीच्या मालकाला याबाबतची माहिती दिली. शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबतची माहिती दिल्यानंतर या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा घडल्याची हद्द शाहूपुरी पोलीस ठाण्याची  असल्याने हा गुन्हा तेथेे वर्ग करण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत