साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा वाद नेमका काय?

सातारा : रायगड माझा वृत्त 

हेरिटेज प्रॉपर्टी असलेल्या तलावांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करु नये, यासाठी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उच्च न्यायालयात दोन वर्षांपूर्वी एक याचिका दाखल केली होती. हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जाऊ नये, असा निर्णय न्यायालयाने या याचिकेवर दिला होता. त्यावर प्रशासकीय यंत्रणेने दोन वर्ष कृत्रिम तळं तयार करुन दिलं होतं.

उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सातारा नगरपालिकेने अपिल केलं होतं. यामध्ये त्यांनी साताऱ्यातील मंगळवार तळे, मोती तळे आणि फुटका तलाव यामध्ये विसर्जन करण्यास परवानगी मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आपला आधीचाच निकाल कायम ठेवला.

कोर्टाच्या निकालावर साताऱ्यातील खासदार उदयनराजे आक्रमक झाले. त्यांनी मंगळवार तळं आपल्या मालकीचं असून त्यामध्येच गणेश मूर्तींचं विसर्जन करावं, अशी न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेतली. सातारकरांच्या भावनेचा प्रश्न आहे, अशी भूमिका उदयनराजेंनी ठेवली.

या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सातारा शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेश धरणांमध्ये विसर्जन करावे असा निर्णय घेतला.कण्हेर धरण हे सातारा शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. इतक्या लांब जाऊन विसर्जन करणे हे साताऱ्यातील गणेश भक्तांना अवघड असल्याची भूमिका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली. प्रशासकीय यंत्रणेने सातारा शहरातच कृत्रिम तळं उभं करुन निर्णय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशासकीय यंत्रणेने तातडीच्या बैठका घेऊन सातारा शहरातच कृत्रिम उभा करण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यातील करंजे पेठेतील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शेती फार्म हाऊसमध्ये कृत्रिम तळे तयार करण्यास सुरुवात केली. वाद मिटल्याचं एकंदरीत चित्र दिसत असताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांची दुटप्पी भूमिका दोन पत्रांच्या माध्यमातून दाखवून दिली.

खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी प्रशासकीय यंत्रणेला मंगळवार तळे हे आमच्या मालकीचे असून त्यामध्ये गणेश विसर्जन करु दिले जाणार नाही, असं पत्राने कळवल्याचं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. उदयनराजे भोसले यांनी सातारकरांची माफी मागावी अशी मागणी यावेळी शिवेंद्रराजेंनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत