साताऱ्यात बनावट नोटांचे रॅकेट उद्‌ध्वस्त

6 जणांची टोळी जेरबंद : 56 लाखाच्या नोटा जप्त

 

सातारा : रायगड माझा 

सातारा शहरातील कोटेश्‍वर मंदीर परिसरात बनावट नोटा छापून विकणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून 56 लाख 42 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेले सर्व आरोपी सातारा शहरातील असल्याने बनावट नोटांचे कनेक्‍शन किती खोलवर आहे याचा तपास करण्याचे आव्हान सातारा पोलिसांच्या पुढे आहे.

अनिकेत यादव व अमोल शिंदे हे दोघे कोटेश्‍वर मंदिर परिसरात बनावट नोटा बाजारात चालवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाने कारवाई करत आरोपींच्याकडे 26 लाख 54 हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, तर 29 लाख 88 हजार रुपयाच्या अर्धवट छापलेल्या नोटा अशा एकूण 56 लाख 42 हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी मुख्य सुत्रधार गणेश भोंडवे, अमोल शिंदे, अनिकेत यादव, अमेय बेलकर, राहूल पवार व अन्य एक असे सहा आरोपींना ताब्यात घेतले आहेत.

दोनच दिवसांपूर्वी सांगलीत बनावट नोटा चालवणाऱ्या गौस गब्बर मोमीन याला तसेच नोटा पुरवल्याप्रकरणी साताऱ्यातील एमआयडीसीत राहणाऱ्या शुभम खामकर याला एलसीबीने अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बनावट नोटा चालवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत