साताऱ्यात महामार्गावर पाच लाखांचा गांजा जप्त

सातारा : रायगड माझा वृत्त

सातारा शहराजवळील शिवराज पेट्रोल पंपाच्या परिसरात आज दुपारी पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने कार जप्त करत पळशी (ता. खटाव) येथील दोघांना अटक केली. या कारमधील पाच लाख रुपये किमतीचा 86 किलो गांजा जप्त करण्यात आला.

कऱ्हाड येथून कारमधून साताऱ्याकडे गांजा नेण्यात येणार असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यानुसार शेख व कर्मचाऱ्यांनी महामार्गावर पाळत ठेवली. दुपारी चारच्या सुमारास महामार्गावरून निघालेल्या कारचा (एचएच 11 वाय 3796) पाठलाग करून ती शिवराज पेट्रोल पंप परिसरात अडवण्यात आली. पोलिसांनी कारमध्ये असणाऱ्या दोघांना ताब्यात घेत कारची तपासणी केली. शंकर विलास जाधव व लक्ष्मण अंकुश जाधव (रा. पळशी, ता. खटाव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तपासणीत पोत्यामध्ये गुंडाळलेल्या पिशव्या सापडल्या. या पिशव्यांत गांजा ठेवला होता. पंच, वजन काटा, फॉरेन्सिक पथकाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. या पथकाने जप्त गांजाची तपासणी तसेच वजन केले. जप्त केलेल्या गांजाचे वजन 86 किलो असून, त्याची बाजारभावानुसार किंमत पाच लाख 20 हजार रुपये आहे. पोलिसांनी गांजा, कार, दुचाकी, दोन मोबाईल संच असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत