साबळेंच्या विरोधात कोकणात विरोधकांची एकजूट!

राष्ट्रवादीच्या साथीला शेकाप, मनसे तर काँग्रेस आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भूमिका येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल.

 

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त |

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून विधान परिषदेवर निवडण्यात येणाऱ्या प्रतिनिधीच्या निवडणुकीसाठी कोकणात भाजपा-सेना युतीच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले असल्याचे चित्र आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ९४१ प्रतिनिधी या निवडणुकीसाठी मतदार असून भाजपा-सेना युतीतर्फे शिवसेनेचे राजीव साबळे यांनी बुधवारी अर्ज दाखल केला, तर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीत साबळे आणि तटकरे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यापैकी साबळे यांना फक्त भाजपाचा पाठिंबा आहे, तर राष्ट्रवादीच्या तटकरे यांना शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच काँग्रेस आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भूमिका येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल, असे तटकरे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत नमूद केले. त्यांचा कोणाला पाठिंबा राहील, हे अजून गुलदस्त्यात असले तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत तो राष्ट्रवादीला राहील, असे संकेत देत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयाची हॅटट्रीक करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत