सामाजिक वनीकरणसाठी आणलेली झाडे रस्त्यावर !

रस्त्यावर ठेवलेल्या झाडांची नासधूस, वारे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, शासनाच्या वृक्षरोपण संकल्पनेला वारे ग्रामपंचायतकडून हरताळ 

नेरळ – कांता हाबळे
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली झाडे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. या वृक्षांची लागवड केली नसल्याने रोपांची जनावराकडून नासधूस झाली आहे. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असून ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
      मोदी सरकारने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष रोपणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार सर्वच ठिकाणी तसेच ग्रामपंचायतीना दरवर्षी पावसाळ्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत झाडे पुरवली जातात, यावर्षी देण्यात आली आहेत.  कर्जत तालुक्यातील वारे ग्रुपग्रामपंचायतीला वारे व परिसरातील वाड्या पाड्यांवर. पडीक जमिनीवर ,रस्त्याच्या दुतर्फा, परिसरात झाडे लावण्यासाठी या विभागाकडून सुमारे 1200 रोपे देण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायतीकडून त्या रोपांची लागवड न करता रस्त्याच्या कडेला टाकली आहे. त्यामुळे वारे ग्रामपंचायतीला वृक्ष रोपणाचे महत्व पटवून देण्याची गरज असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
 शासनाकडून दरवर्षी झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. वृक्ष तोडीमुळे निसर्गाची होत असलेली हानी,सतत येणारी नैसर्गिक आपत्ती पर्यावरणचे बदलते स्वरूप लक्षात घेता राज्यभरात शासनाच्या विविध विभागाकडून सामाजिक संस्थान कडून वृक्ष रोपनाचे कार्यक्रम केले जातात परंतु शासनाच्या या संकल्पनेलाच ,वारे ग्रामपंचायतकडून हरताळ फासल्याचे चित्र रस्त्यावर टाकलेल्या रोपाकडे पाहता दिसून येते
वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून 1200 रोपे मिळाली असून त्यापैकी काही रोपाची जांभूळवाडी  रस्त्याच्या दुतर्फा लागवड केली आहे .दोन दिवसात झाडे अंगणवाडी व शाळेस देऊ ,शिल्लक झाडाची लागवड ग्रामपंचायतकडून करण्यात येईल
  – सुरेखा भाबळे
 (ग्रामसेविका ग्रुपग्रामपंचायत वारे )
ग्रामपंचायतीस आलेली झाडाची रोपे गेल्या आठ दिवसापासून रस्त्यावर पडून आहेत. या झाडांकडे ग्रामपंचायतीने कडून दुर्लक्ष केल्याने रोपाची नासधूस झाली आहे.
– शशिकांत म्हसे
माजी सदस्य, वारे ग्रामपंचायत
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत