सायनाच्या बायोपिकचा शुभारंभ सप्टेंबरपासून

मुंबई : रायगड माझा वृत्त 

सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावरील चरित्रपटाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच, सप्टेंबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका साकारणार असून ही भूमिका चांगली व्हावी म्हणून ती प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.

सायनाचं आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवताना कोणतीही उणीव राहू नये असं श्रद्धाला वाटतं. त्यामुळंच तिनं आपला दिनक्रमही बदलला आहे. सध्या ती ‘स्त्री’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ या दोन आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तरीही वेळात वेळ काढून ती बॅडमिंटनचा सराव करताना दिसतेय.

‘बॅडमिंटन हा एक अवघड आणि आव्हानात्मक खेळ आहे. परंतु मी खेळाचा आनंद घेऊन सराव करतेय. गेल्या काही दिवसांपासून मी सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडं प्रशिक्षणही घेतेय. असं असली तरी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. पुढच्या महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होते आहे. मात्र, बॅडमिंटन खेळाची दृश्यं पुढच्या वर्षीच चित्रीत करण्यात येतील,’ असं श्रद्धानं ‘मुंबई मिररशी’ बोलताना सांगितलं.

कोणत्याही खेळाडूच्या जीवनावरील चित्रपटात काम करताना इतर चित्रपटांपेक्षा तुलनेनं अधिक मेहनत घ्यावी लागते. आता सायनाची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारायची म्हणजे श्रद्धाला बॅडमिंटनच्या कोर्टवर घाम तर गाळावा लागणारच. या चित्रपटाचं नाव अजून ठरलं नसून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई आणि हैदराबादमध्ये होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.