सावधान! पेट्रोलपंपावर डेबिट कार्ड वापरताय!

ठाणे : रायगड माझा वृत्त 

तुम्ही जर पेट्रोल भरताना आपले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पैसे देण्यासाठी वापरत असाल तर सावधान! कारण तुम्ही दक्षता न बाळगता पेट्रोलपंपावर तुमचे कार्ड दिले, तर तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. होय, हे खरे असून ठाण्यातील एका पेट्रोलपंपावर अशाच प्रकारे ग्राहकांच्या कार्डची क्लोनींग करीत बँक खात्यातून पैसे उडवणार्‍या कर्मचार्‍यास नौपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मन्नू सिंग (24) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्‍याचे नाव असून त्याने पेट्रोल पंपावर पेट्रोलचे पैसे कार्डद्वारे चुकते करणार्‍या ग्राहकांना ऑनलाइन गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी हा नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका पेट्रोलपंपावर काम करीत होता. आरोपी या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यास येणार्‍या आणि कार्डने बिल देणार्‍या ग्राहकांचे पिन नंबर चोरून बघायचा आणि नंतर त्या कार्डचे क्‍लोनिंग करीत खात्यातून ऑनलाइन पैसे लंपास करायचा. या पेट्रोलपंपावर कार्डद्वारे बिल पेड करणार्‍या नागरिकांच्याच खात्यातून रक्कम ऑनलाइन लंपास होत असल्याच्या अनेक तक्रारी नौपाडा पोलीस ठाण्यात येऊ लागल्याने पोलिसांना या पेट्रोलपंपवर काहीतरी गफलत सुरु असल्याचा संशय आला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सुरतवरून एक सीसीटीव्ही फुटेज ठाणे पोलिसांच्या हाती आले. त्यामध्ये काही आरोपी ठाण्यातील नागरिकांच्या खात्यातून पैसे काढत असल्याचे आढळून आले. सीसीटीव्हीत दिसणार्‍या आरोपीचा जेव्हा पोलिसांनी शोध सुरु केला तेव्हा त्यातील एक चेहरा नौपाड्यातील त्याच पेट्रोलपंपावर काम करणारा एक मुलगा असल्याचे समोर आले. पोलिसांनी या युवकाला लगेच ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

अशी करायचा हेराफेरी –

जेव्हा नागरिक या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यास जायचे आणि त्यानंतर पैसे कार्डद्वारे द्यायचे. तेव्हा आरोपी हळूच त्यांचा पिन कोड पाहून घ्यायचा. त्यानंतर स्टीमरद्वारे ते कार्ड स्कॅन करून त्यातील सर्व माहिती हा चोरटा मिळवायचा. त्यानंतर आपल्या अन्य काही साथीदारांच्या मदतीने तो या माहितीवरून नकली कार्ड बनवून व पिन कोड वापरून बाहेरच्या राज्यातून पैसे लंपास करायचा. त्यात खासकरून हे भामटे पैसे रात्रीच्या वेळी 11 ते पावणे बारा वाजताच्या वेळेत काढायचे. नंतर 12 वाजले की, पुन्हा पैसे काढायचे. त्यामुळे जास्त पैसे काढता यायचे. त्यातच रात्री लोक झोपलेले असल्याने एटीएममधून पैसे काढल्याचा मॅसेज लगेच वाचायचे नाहीत त्याचा त्यांना फायदा मिळायचा.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत