सावधान: या ठगापासून सावध रहा; EPFOचं आवाहन

रायगड माझा ऑनलाईन । मुंबई

Image result for सावधान

एक भामटा वांद्र्याच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून कर्मचाऱ्यांना चुना लावण्याचा प्रयत्न करत आहे. दीपक शर्मा असे नाव सांगणारा तो भामटा 9102195592 या मोबाईल नंबरवरून कर्मचाऱ्यांना फोन करतो आणि आधारकार्ड, पॅनकार्ड आदी महत्त्वाच्या कागदपत्रांची डिटेल मागतो. तेव्हा अशा भामट्याकडून सावधान राहण्याचे आवाहन भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून करण्यात आले आहे.

इंटरनेटवर गुगलमध्ये वांद्र्याच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा पत्ता, कामकाजाची वेळ आदी माहिती उपलब्ध आहे. त्याचबरोबर तेथे 9102195592 हा मोबाईल नंबर प्रकर्षाने लक्ष वेधून घेतो, पण हा नंबर वांद्रे कार्यालयाशी संबंधित नसल्याचे भविष्य निर्वाह निधीच्या वांद्रे प्रादेशिक कार्यालयातून एका जाहिरातीद्वारे जाहीर केले आहे. ट्रू कॉलर ऍपवर पाहिल्यास हा मोबाईल नंबर दीपक शर्मा नावाच्या व्यक्तीचा असल्याचे दिसते. ही व्यक्ती कर्मचाऱ्यांना संपर्प साधून तुम्हाला भविष्य निर्वाह निधी काढून देतो किंवा तुमच्या खात्याच्या माहितीचे नूतनीकरण करण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि एटीएम कार्डची माहिती मागतो. भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले जात असल्याने कर्मचारीदेखील त्याच्यावर विश्वास ठेवून तो मागेल ती माहिती देत आहेत.

आम्ही कोणतीही माहिती मागत नाही

भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी किंवा खात्याचे नूतनीकरण करण्यासाठी आम्ही कोणालाही फोन अथवा ई-मेलद्वारे महत्त्वाच्या कागदपत्रांची अजिबात माहिती मागत नाही. त्यामुळे एखाद्या मोबाईल नंबरवरून माहिती मागितली जात असेल तर कोणालाही महत्त्वाच्या कागदपत्रांची डिटेल देऊ नका, असे आवाहन सहाय्यक पीएफ आयुक्तांनी एका जाहिरातीद्वारे केले आहे. 9102195592 या नंबरवरून कॉल करणाऱ्यांविरोधात सायबर पोलीस ठाणे आणि निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत