साहित्य महामंडाळचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

पुणे : रायगड माझा वृत्त

साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यामुळं निर्माण झालेल्या वादानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जोशी यांनी आपला राजीनामा विदर्भ साहित्य संघामार्फत साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देव यांच्याकडं ई- मेलनं पाठवला आहे. जोशी यांनी राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलेलं नाही. ‘जे जे सांगायचे होते, ते सांगून झाले आहे. गेले दोन दिवस माध्यमांच्याच सेवेत असल्यानं महामंडळाचे अध्यक्ष काहीही काम करू शकलेले नाहीत. थकून गेले आहेत. कृपया कुणीही त्यांच्याशी संपर्क साधू नये,’ असं जोशी यांनी माध्यमांना कळवलं आहे. यापुढे काहीही माहिती हवी असल्यास महामंडळाच्या उपाध्यक्षांकडं विचारणा करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द होण्यासाठी श्रीपाद जोशी हेच जबाबदार असल्याचा आरोप साहित्य वर्तुळातून केला जात होता. जोशी यांनी आयोजकांना यासाठी जबाबदार धरले होते. मात्र, आयोजकांनी साहित्य महामंडळाचा मेसेज आमच्याकडं असल्याचं म्हटलं होतं. यामुळं जोशी वादात सापडले होते. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला असावा, असं बोललं जात आहे.

उद्या नव्या अध्यक्षांची निवड?
जूनमध्ये लागू झालेल्या महामंडळाच्या नवीन घटनेनुसार अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास त्यांचे अधिकार उपाध्यक्षांकडे असतील. राजीनाम्यानंतर एक महिन्यात बैठक घेऊन नवीन अध्यक्ष नेमणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनामुळे महामंडळाची पूर्वनियोजित बैठक उद्या यवतमाळ येथे होणार आहे. उद्याच्या बैठकीत जोशी यांचा राजीनामा स्वीकारला गेल्यास त्याचवेळी नवीन अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. महामंडळाचे कार्यालय सध्या विदर्भ साहित्य संघाकडे असल्याने विदर्भ साहित्य संघाचा महामंडळातील प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून निवडला जाईल. महामंडळाच्या कार्यालयाची जबाबदारी पुढील तीन वर्षांसाठी १ एप्रिलपासून मराठवाडा साहित्य परिषदेकडे जाणार असल्याने नवीन अध्यक्षाला केवळ अडीच ते तीन महिने इतका कार्यकाळ मिळणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत