सिंचन घोटाळ्यात अजित पवारांच्या अडचणीत वाढ;चौकशीवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे काेर्टाचे आदेश

(रायगड माझा ऑनलाईन|नागपूर)

नागपूर-राज्यातील सिंचन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्पाचे कंत्राट बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळवून देण्यात पवार यांची काय भूमिका होती हे तपासले जात आहे. त्यावेळी पवार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष होते.

एसीबी बुलडाणाचे पोलिस उपअधीक्षक शैलेश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. यासंदर्भात कंत्राटदार अतुल जगताप यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. पवार व कंपनीचे संचालक माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून कंपनीला अवैधरित्या सिंचन प्रकल्पांची कंत्राटे मिळवून दिली असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मागील तारखेला न्यायालयाने या प्रकरणात पवार यांची काय भूमिका आहे, अशी विचारणा केली होती. त्यामुळे ही माहिती न्यायालयाला देण्यात आली. टेंडर मंजूर करणे, मोबीलायजेशन अॅडव्हान्स देणे व कार्यादेश जारी करणे यात पवार यांची भूमिका तपासली जात आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. श्रीधर पुरोहित हे काम पाहात अाहेत.

विस्तृत प्रतिज्ञापत्र देण्याचा आदेश
प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जाधव यांच्या प्रतिज्ञापत्रात एकाच प्रकल्पाची माहिती देण्यात आल्यामुळे न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. तसेच, बाजोरिया कन्स्ट्रक्शनकडील जिगावसह इतर तीन प्रकल्पांच्या चौकशीवर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश सरकारला दिला. या आदेशाचे पालन न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल, अशी तंबीही सरकारला दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत