सिंधुदुर्गात शेतकऱ्यांचे वन कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण

सावंतवाडी : रायगड माझा वृत्त 

इन्सुली डोबाशेळ येथे गवा तसेच अन्य वन्य प्राण्यांकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या प्रश्नी आज तेथील ग्रामस्थांनी वन्यप्राण्याचा कायमचा बंदोबस्त करा, या मागणीसाठी वन कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण केले.

तालुक्‍यात सध्या गवा रेडे व अन्य वन्यप्राण्यांचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आपल्या शेत जमिनी शेती न करताच पडीक सोडल्या आहेत. वनविभागही या गवा रेड्यांना आळा घालण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे लोकांचा रोष वाढत असुन शेतकरीही सततच्या नुकसानीने त्रस्त झाले आहेत.

इन्सुली डोबाशेळ येथे भात शेतीला लागुन मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. गेले दोन ते तीन वर्षे त्याठिकाणी गवा रेडे तसेच अन्य वन्य प्राण्यांचे वास्तव असून हे प्राणी भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. तेथील ग्रामस्थांनी गेल्यावर्षी याबाबत वनविभागाचे लक्ष वेधले होते; मात्र त्यावर काहीच उपाययोजना झाल्या नाहीत.

संतप्त ग्रामस्थांनी आज गव्यांचा कायमचा बंदोबस्त करा, या मागणीकरिता वनविभागाकडे उपोषण केले. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेवून लवकरच त्याठिकाणी उपाययोजना करण्यात येतील. सौर कुंपणाद्वारे गव्यांना रोखण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

यावेळी माजी आरोग्य व शिक्षण सभापती पेडणेकर, बाळा गावडे, राजू कासकर, विठ्ठल पालव, सूर्यकांत सावंत, भिकाजी सावंत, सुस्मिता पालव, भाग्यश्री पालव, ज्योती पालव, रसिका पेडणेकर, संजय पेडणेकर, नारायण मयेकर, लवू नाईक आदी उपोषणात सहभागी झाले होते.

उपोषणाला अनेकांचा पाठिंबा
डोबाशेळ ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शविला. यामध्ये स्वाभिमानचे नगरसेवक राजू बेग, सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, अशोक दळवी, चंद्रकांत कासार, मनसेचे राजू कासकर आदींनी पाठिंबा दर्शविला.

झिरंग परिसरातही नुकसानी
शहरात झिरंग परिसरातही गव्यांचा उच्छाद सुरू असुन शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आला आहे. नागरिकातही भीती असून गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना राबवा, असे नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत