सिडको अर्बन हाट येथे हस्तकला प्रदर्शन २०२०चे आयोजन

नवी मुंबई : साईनाथ भोईर (प्रतिनिधी)

सिडको अर्बन हाट येथे ३० ऑक्टोबर २०२० ते ८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत विशेष व दर्जेदार स्वदेशी हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विकास आयुक्त, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, नवी दिल्ली हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहेत. दरवर्षी पावसाळ्यानंतर अर्बन हाट येथे विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते परंतु या वर्षी कोविड-१९ चा प्रसार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बंद असणारे अर्बन हाट या प्रदर्शनापासून म्हणजे ३० ऑक्टोबर २०२० पासून खुले होत आहे.

या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या विविध राज्यांतील ५० हून अधिक कारागीर आपल्या विशेष व दर्जेदार उत्पादनांसह सहभागी होणार आहेत. भारताच्या विविध भागांतील कारागिरांनी तयार केलेल्या स्वदेशी उत्पदनांना प्रोत्साहन देण्याकरिता त्यांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही मध्यस्थाशिवाय आपल्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी या कारागिरांना मिळणार आहे. प्रदर्शनामध्ये सहभागी होणारे कलाकार तसेच प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या रसिकांकडून कोविड-१९ संबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची पुरेपूर खबरदारी आयोजकांकडून घेण्यात येणार आहे. अर्बन हाटचा परिसर खुला असल्याने तसेच तेथे उभारण्यात येणारे स्टॉल आकाराने मोठे असल्याने सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे शक्य होणार आहे. अर्बन हाटला भेट द्यायला येणाऱ्यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनिंग व सॅनिटायझर किंवा हॅन्ड वॉशने निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देण्यात येईल.

सध्याच्या सणासुदीच्या कालावधीतील मागणी लक्षात घेता उपरोक्त दहा राज्यांतील कारागिरांनी निर्मिलेल्या सुती व रेशमी साड्या, ड्रेस मटेरिअल, दुपट्टा, बेडशीट, पडदे, कृत्रिम दागिने, दिवे, दिवाळीसाठी सजावटीच्या वस्तू, मेणबत्त्या, उदबत्त्या, चामड्याच्या व ज्युटच्या पिशव्या, कोल्हापुरी चपला, बांबूची उत्पादने इ. प्रदर्शनार्थ मांडण्यात येणार आहेत. फुड प्लाझा सेक्शनमध्ये विविध प्रांतांतील खाद्यपदार्थही खवय्यांच्या रसनातृप्तीसाठी असणार आहेत. अर्बन हाटच्या निसर्गरम्य परिसरात मुक्तपणे विहरणाऱ्या फुलपाखरांच्या विविध प्रजाती पाहण्याची संधीही निसर्गप्रेमींना मिळणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या रसिकांनी आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना आणू नये अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत