सुधागडातील ग्रा.प. निवडणुकीचा प्रचार शिगेला !

कार्यकर्त्यांचा प्रचार रॅली आणि रोड शो वर भर

पाली : विनोद भोईर

सुधागड तालुक्यात १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून पाली ग्रामस्थांनी तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी नगरपंचायतीसाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे पाली शहरातील वातावरण शांत असले तरी तालुक्यातील परळी, जांभूळपाडा, राबगाव दहीगाव, महागाव, नाडसुर या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये तुल्यबळ सरपंचपदाचे उमेदवार असल्यामुळे चुरशीच्या लढती बघायला मिळणार आहे. या सर्व लढतीमध्ये परळी, जांभूळपाडा,राबगाव येथील लढती कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

परळी मध्ये शिवसेनापुरस्कृत उमेदवार राजेश परदेशी यांची सरळ लढत संदेश कुंभार यांचाशी असुन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांची ही ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. परळी मध्ये संदेश कुंभार यांनी मोठी आघाडी उभारली असून प्रकाश देसाई यांना ही निवडणूक सहजपणे जीकने शक्य दिसत नाही. राजेश परदेशी हे शिक्षित तरुण तसेच सर्वांमध्ये लगेच मिसळणारे आणी लोकांच्या मदतीला धावणारे म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे ते देखील कडवी झुंज देतील यात शंका नाही. जांभूळपाडा ग्रामपंचायती मध्ये तिरंगी लढत होणार असून भाजपकडून श्रद्धा गणेश कानडे,शिवसेनाकडून रंजना खंडागळे तर शेकापकडून बहाडकर यांचात लढत होणार आहे. तर राबगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ग्रामविकास आघाडीच्या श्रद्धा संतोष भोईर, शेतकरी कामगार पक्षाच्या कविता केशव वाळंज व भाजपचे सुधीर शंकर पाडसे यांच्यात तिरंगी लढत होणार असून या तिरंगी लढती मुळे ग्रामविकास आघाडीचे यशवंत भोईर व शेकापचे बाजीराव भोईर यांना खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे.

शेकापचे तालुक्यातील नेते सुरेश खैरे यांनी त्यांच्या विभागातील नांदगाव आणि गोमाशी ग्रामपंचायत बिनविरोध आणल्यामुळे आपल्या नेतृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय तालुक्याला दाखवून दिला आहे. एकंदरीत यावेळची निवडणूक जेथे जेथे लढती होत आहे तेथील नागरिकांना लक्षात राहणाऱ्या असणार असून राजकारणातील सर्वच आयुधांचा वापर होताना दिसत आहे. कुठे जाती-पातीचे राजकारण तर कुठे मराठी-अमराठी तर कुठे लक्ष्मी बळाचा देखील वापर होताना दिसत आहे.

तालुक्यात या १३ ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराचा मोठा धुरळा उडाला असून सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला असून मे महिन्याच्या कडकडीत उन्हात कार्यकर्त्यांसह रोड शो तसेच शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत. २५ मेला संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपणार असून रविवारी मतदान झाल्यानंतर मतदारांनी कोणाला पसंद करून कोणाच्या पारड्यात सत्तेची किल्ली देतात हे बघणे चुरशीचे ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत