सुधागडात ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापची बाजी!

शिवसेना दोन, आघाडी एक तर पाली ग्रामपंचायतीवर अपक्षाचा राज  

पाली : विनोद भोईर

सुधागड तालुक्यात दि.(२६) सप्टेंबरला पाली, वाघोशी, उध्दर, कुंभारशेत नागशेत, नेणवली, चिखलगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या यामध्ये नागशेत, नेणवली, चिखलगाव या ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाल्या तर उर्वरित चार ग्रामपंचायती मध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. यामध्ये शेकापने बाजी मारीत सात पैकी तीन ग्रामपंचायतीवर लाल बावटा फडकवला आहे. तर शिवसेनेने दोन ग्रामपंचायतीवर शिक्कामोर्तब केला असून एका ग्रामपंचायतीवर अपक्ष राज आले आहे तर एका ग्रा.प वर शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.

 पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला असतांना मात्र पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत झाली यामध्ये विश्वनाथ गणेश बालके (बाळा कोळी) यांना २३४५ मते मिळाली तर ओमकार बळीराम जाधव यांना ५१४ यामध्ये विश्वनाथ गणेश बालके (बाळा कोळी) हे १८१३ मतांनी विजयी झाले. तर पाली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. ५ मध्ये बल्लाळ गोविंद पुराणिक व विजय मधुकर मराठे यांच्यात सदस्य पदासाठी लढत झाली. यामध्ये विजय मधुकर मराठे यांना २५२ मते तर बल्लाळ गोविंद पुराणिक यांना १५० मते मिळाली यामध्ये १०२ मतांनी विजय मराठे विजयी झाले.

वाघोशी ग्रामपंचायतीमध्ये अंकिता विशाल चिले व संजना संजय सगळे यांच्यात सरपंच पदाची निवडणूक झाली यामध्ये अंकिता विशाल चिले यांना १२३५ मते पडली तर संजना संजय सगळेनां ८८६ मते मिळाली यामध्ये शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची अंकिता विशाल चिले या ३४९ मतांनी विजयी झाल्या. उध्दर ग्रामपंचायतीमध्ये मुक्ता लहू बांगरे व जयवंती तुकाराम जठार यांच्यात सरपंचपदाची लढत झाली. यामध्ये मुक्ता लहू बांगरे यांना ६३९ मते मिळाली तर जठार यांना ४५२ मते पडली यामध्ये शेकापच्या मुक्ता लहू बांगरे १८७ मतांनी विजयी झाल्या.

कुंभारशेत ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी प्रभाग क्र. १ मध्ये किशोर दिलीप खरिवले व संदीप लक्ष्मण फुलारे यांच्यात लढत झाली यामध्ये किशोर दिलीप खरिवले यांना १४८ मते तर संदीप लक्ष्मण फुलारे यांना १३० मते मिळाली यात शिवसेनेचे किशोर दिलीप खरिवले हे १८ मतांनी विजयी झाले. तर प्रभाग क्र. १ मधील दुसरे महिला राखीव उमेदवार वृषाली प्रवीण खरिवले व जान्हवी मनोज सोनावले यांत लढत झाली यामध्ये खरिवले यांना १४४ मते तर सोनावलेनां १३८ मते मिळाली यात शिवसेनेच्या वृषाली प्रवीण खरिवले या ६ मतांनी विजयी झाल्या. तर सरपंचपदी शिवसेनेचे सुनील वामन ठोंबरे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

चिखलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या कुसुम बालाजी शिद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नागशेत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापचे राजू शंकर पवार हे बिनविरोध आले आहेत. नेणवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या आशा विजय धानूधरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

पाली तहसीलदार कार्यालयात सदर ग्रामपंचायत निवडणूकींची मतमोजणी तहसीलदार बी.एन. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडूनये याकरिता पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • शेकाप :  उध्दर, नेणवली ,नागशेत
  • शेकाप-राष्ट्रवादी आघाडी : वाघोशी
  • शिवसेना  : कुंभाशेत, चिखलगाव
  • अपक्ष: पाली  
शेयर करा

One thought on “सुधागडात ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापची बाजी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत