सुधागडात 50 जणांना अतिसार आजाराची लागण; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप

पाली : विनोद भोईर

सुधागड तालुक्यातील आसरे गावातील 50 जणांना अतिसार आजाराची लागण झाली आहे. एका विहीरीचे पाणी प्यायल्याने अतिसार आजाराची लागण झाली असल्याचे समजते. या सर्व रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळपाडा येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. खिलारे यांनी प्राथमिक उपचार केले. तर यातील एका गंभीर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात आले आहे.

नवघर आसरे गावात दोन दिवस विजपुरवठा खंडीत झाल्याने नळ पाणीपुरवठा बंद झाला होता.  परिणामी गावातील नागरीकांनी विहीरीचे पाणी प्यायल्याने त्यातील 50 जणांना अतिसाराची लागण झाल्याचे समोर आले. रुग्णांमध्ये जुलाबाची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकिय पथकाने गावात जावून सदर विहीरीची पाहणी केली तसेच गावातील घराघरात जावून नागरीकांच्या आरोग्याची तपासणी केली.

पाण्याचे स्त्रोत दूषित
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याने जलजन्य आजाराच्या रुग्नांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच सुर्यप्रकाशाचा अभाव व थंड वातावरण यामुळे वातावरणात रोगजंतूचा  प्रादुर्भाव वाढताना दिसतो. या मोसमात सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढत असल्याने भुमिगत जलस्त्रोत्र खराब होतात. रोगजंतूवाढीसाठी हे पोषक वातावरण असल्याने अशा प्रकारच्या साथीच्या आजारांचा जलदतेने फैलाव होतो.  

“सर्व रुग्णांना ओआरएस पॅकेट व जुलाब थांबण्याच्या औषधाच्या गोळ्या दिल्या आहेत. तसेच सर्व रुग्णांना पाणी शुध्द करुन पिण्याचा सल्ला दिला गेला आहे.” – डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत