सुनिल तटकरें भाजपच्या उपकाराची परतफेड करणार

  • केंद्रियमंत्री ना. अनंत गितेंचा माणगांवच्या जाहीर सभेत गौप्यस्फोट
  • तटकरेंनी जिल्ह्यातील सर्वांचा विश्वासघातच केला आहे
  • यापुढे सर्व निवडणूका शिवसेना स्वबळावरच लढवणारचा पुनरुच्चार

माणगांव : प्रवीण गोरेगांवकर

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परीषद निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरेंना मदत केली. या उपकाराची परतफेड आ. सुनिल तटकरे कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत करणार असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीयमंत्री तथा रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार अनंत गीते यांनी शुक्रवारी माणगांव येथे गांधी ह़ॉलमध्ये आयिजित जाहीर सभेत केला.

यावेळी व्यासपिठावर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. रविंद्र फाटक, आ. भरत गोगावले, शिवसेना उपनेते विजय कदम, ॲड. राजीव साबळे, जिल्हाप्रमुख रविशेठ मुंढे, तालुकाप्रमुख अनिल नवगणे, किशोर जैन, सभापती राजेश पानवकर, राजिप सदस्या स्वाती नवगणे, अमृता हरवंडकर, शहरप्रमुख  अजित तार्लेकर, नगरसेवक नितिन बामगुडे, समीर शेडगे, संजीव जोशी, महेंद्र तेटगुरे, विकास गोगावले, राजू शिर्के, सरपंच अरुणा वाघमारे, वैभव मोरे, कपिल गायकवाड, इब्राहीम करेल, आदी मान्यवरांसह शिवसैनिक व पदवीधर मतदार मोठया संख्येने उपस्थित होते..

कोकण पदवीधर मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय भाउराव मोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा शुक्रवार दि. 22 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजता गांधी मेमोरीयल हॉल् माणगांव याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ना. गिते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने प्रथमच हि पदवीधर मतदार संघाची निवडणूक शिवसेना लढवित आहे.  मुंबई वरळी येथे शिवसेना राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक झाली. त्या बैठकीत यापूढे सर्व निवडणूका  शिवसेना स्वबळावर लढवणार असा ठराव घेण्यात आला होता. त्यानंतर पालघर लोकसभेची  पोटनिवडणूक व कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढली. आता कोकण पदवीधर मतदार संघाची आपण पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहोत. संजय भाऊराव मोरे हे आपले उमेदवार आहेत. आपल्याला भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांविरुध्द लढून जिंकायचे आहे. कोकण भगव्याचा गड व शिवसेनेचा बालेकिल्ला हे सिध्द करण्याची वेळ 25 तारखेला आली आहे. कोकणात शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकलाच पाहिजे असा निर्धार आपण सा-यांनी करु या असे शेवटी ना. गिते यांनी सांगितले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.  एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने यावेळी प्रथमच शिवसेना उतरली असून कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. पाच जिल्हयाचा हा मतदार संघ आहे. यापूर्वी जे मतदार संघातून निवडून गेले ते शिवसेनेच्या पाठींब्यामुळे निवडून गेले होते. आता शिवसेना या निवडणूकीत उतरली असून आपल्याला संजय मोरे यांच्यासारखा चांगला उमेद्वार मिळाला आहे. ते विधान परीषदेत पदवीधरांचे आक्रमपणे व साडेतोड असे प्रश्न मांडतील. संजय मोरे हा शाखाप्रमुख, नगरसेवक, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महापौर अशा संघर्षाच्या चळवळीतून पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे तर दुसऱ्या बाजूला स्वपक्षातील उमेदवार नसल्याने आयात केलेला उमेदवार आहे. संजय मोरेंवर अनेक गुन्हे दाखल आहेत परंतू ते जनसामान्यांच्या प्रश्नासाठीचे आहेत. वेळ पडली तर पुढील काळात आणखीही गुन्हे अंगावर घेण्याची तयारी संजय मोरे यांनी दाखवली आहे. जनतेचे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा शिवसेना सरकारच्या बाजूने नाही तर जनतेच्या बाजूने उभी राहते. सरकारमध्ये राहून सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शिवसेना करते.

आ. भरत गोगावले यांनी, सर्व शिवसैनिकांनी  मतदार संघात नियोजनबध्द काम सुरु केले आहे. महाराष्ट्रात भगवा फडकवायचा हे उध्दव ठाकरे यांचे उद्दिष्ट आहे. त्याची सुरवात या निवडणुकीने आपल्याला करायची आहे. शिवसेना व युवा सेना यांनी हातात हात घालून काम केले व मनाशी ठरवले तर हि निवडणूक मुळीच अवघड नाही असे सांगत सर्वांनी एकदिलाने काम करून संजय मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

निरंजन डावखरेंचे डाव खरे ठरणार ?

पदवीधर मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. भाजपमध्ये प्रवेश करून आ. डावखरे यांनी संधी साधली आहे. मात्र ना. गीतेंच्या म्हणण्यानुसार आ. सुनिल तटकरे यांनी भाजपच्या उपकाराची परतफेड केलीच तर निरंजन डावखरे यांचे डाव खरे ठरणार का ? याची चर्चा सभेनंतर सर्वत्र सुरु होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत