सुनिल तटकरे यांची सभागृहात उणीव जाणवत राहील; मुख्यमंत्र्यांची तटकरेंवर स्तुतीसुमने

मुख्यमंत्र्यांकडून सेवानिवृत्तीच्या भाषणात तटकरेंवर स्तुतीसुमने

नागपूर : रायगड माझा वृत्त 

आपले राजकीय मतभेद असले तरी आपल्यासारखे अभ्यासू सदस्य सभागृहात असायलाच हवेत, असे दिलखुलास मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. सुनिल तटकरे यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात व्यक्त केले. तटकरे यांना मी कधी कागद हातात घेऊन तो वाचत बोलताना सभागृहात पाहिले नाही, ते आपल्या विषयांवर उत्स्फूर्तपणे बोलतात. या त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी ते नेहमी लक्षात राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची तटकरेंवर स्तुतीसुमने

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. मंत्री असतानाही त्यांनी आपले काम चोख पार पाडले होते. त्यांनी आयोजित केलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीचे संमेलन भरवण्याचे दडपण पुढच्या लोकांवर आले, इतके ते चांगले होते, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी तटकरे यांच्या कार्यशैलीबाबत बोलताना केले. राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांना न्याय देणारा असा आगळावेगळा, अद्वितीय अर्थसंकल्प त्यांनी मांडला होता, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

कबड्डी स्पर्धेचे देशपातळीवरील आयोजन असो की इतर असे इतर सांस्कृतिक कार्यक्रम, तटकरे यांनी नेहमीच त्यात पुढाकार घेतला. मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून काम करतानाही त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या, आपल्या जिल्ह्याच्या प्रश्नांना नेहमी महत्त्व दिले. तिथल्या प्रश्नांवर उत्तर पदरात पाडून घेण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच एक मोठा जनाधार ते मिळवू शकले, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.

आपल्या अनुपस्थितीत आपल्या अस्तित्वाची जाणीव इतरांना व्हावी, हेच खरे यश असते. सुनिल तटकरे या सभागृहात नसताना त्यांची उणीव आम्हाला नक्कीच जाणवत राहील, अशी प्रांजळ कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. ते देशातील कोणत्याही सभागृहात गेले तरी अशाचप्रकारची उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तटकरे यांचे आजवरचे सर्व आराखडे पूर्णत्वास आले आहेत, तसेच भविष्यातही त्यांना आपले मनोदय पूर्ण करण्यात यश लाभो, अशी शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.