(रायगड माझा ऑनलाईन टीम)
भारतीय क्रिकेट संघातील जलद गोलंदाज जयदेव उनाडकटची खिल्ली उडवणं लिटिल मास्टर सुनील गावसकरांना महाग पडू शकतं. दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या टी-20 सामन्यात जयदेव उनाडकट फक्त एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला. उनाडकटने चार ओव्हर्समध्ये 33 धावा देत एक विकेट मिळवली. सामन्यात गोलंदाजी करत असताना एका ओव्हरमध्ये पाय घसरल्याने उनाडकट खाली पडला. यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या सुनील गावसकरांनी त्याची खिल्ली उडवत टोला मारला.
‘यावेळच्या आयपीएल लिलावात उनाडकटने चांगली कमाई केली आहे. कदाचित यामुळेच त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे’, असं सुनील गावसकर बोलले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘उनाडकटसाठी जितके पैसे दिले जात आहेत, तो त्याच्या योग्य आहे का ?’.
यानंतर मात्र सुनील गावसकर यांनी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं की, ‘मी तर फक्त मस्करी करत होतो’. गावसकरांनी सांगितलं की, ‘जयदेव उनाडकट चांगल्या गतीने गोलंदाजी करतो. याशिवाय स्लो बॉल फेकत फलंदाजाला चकवा देणंही त्याला चांगलं जमतं’.
याव्यतिरिक्त हर्षा भोगले यांनी 2016 मधील वर्ल्ड टी-20 दरम्यान भारतीय संघावर टीका केली होती. यावेळी त्यांनी विरोधी संघाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. ज्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. तुमच्या माहितीसाठी, जयदेव उनाडकट आयपीएलमधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला 11.5 कोटींमध्ये राजस्थान संघाने खरेदी केलं आहे. जयदेव उनाडकटने गतवर्षी पुणे संघातून खेळताना चांगलं प्रदर्शन केलं होतं.