सेनेसोबत युती झाली नाही तर आधीपेक्षा एक जागा जास्तच जिंकू – रावसाहेब दानवे

रायगड माझा वृत्त

राज्यात अद्यापही शिवसेना-भाजपाच्या युतीबाबात निर्णय झालेला नसून दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात वक्तव्य करताना दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीच्या चर्चेसाठी शिवसेना मुंडावळ्या बांधून बसलेली नाही असं वक्तव्य केल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेला टोमणा मारला आहे. युती झाली नाही तर आधीपेक्षा एक जागा जास्तच जिंकू असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

जालन्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, युती झाली नाही तर आधीपेक्षा एक जागा जास्तच जिंकू. पण एकही जागा कमी जिंकणार नाही. याआधी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युती इतकी भक्कम आहे की, सौम्यच काय, तीव्र धक्के बसले तरी काही फरक पडणार नाही. काही तडे गेले असले तरी तेही लवकरच भरून निघतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही युती व्हावी अशीच इच्छा असून ‘युती होणार नाही’ असे सांगणारे संजय राऊत उघडे पडतील, असा दावा केला होता.

गुरुवारी बोलताना शिवेसना मुंडावळ्या बांधून बसलेली नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला होता. भाजपाकडून युतीचा प्रस्ताव येत असल्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी हा टोला लगावला. आमचं मॅरेज ब्युरो नाही, शिवसेना शिवसेना आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

‘आम्ही स्वबळाची घोषणा केली असून प्रस्ताव घ्यायला बसलेलो नाही. हल्ली सगळ्यांनाच शिवसेनेशी जवळीक साधावं असं वाटत आहे. पण शिवसेना येथे मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट पाहत बसलेली नाही’, असं संजय राऊत यांनी म्हटलं. दरम्यान सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत युतीच्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत