सेवाग्रामात देशातील सर्वांत मोठा चरखा

वर्धा : रायगड माझा वृत्त

जगातील सर्वांत मोठा चरखा सेवाग्राम येथील आश्रम  प्रतिष्ठानच्या जागेवर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी उभारण्यात येणार आहे. हा चरखा देशातील एकमेव मेटल शिक्षण महाविद्यालयात निर्मित करण्यात आला आहे. गिनेस आणि युनिक बुक  ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारा हा चरखा तब्बल साडेपाच टन लोखंडातून साकारण्यात आला  आहे. 

हा चरखा मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अवघ्या २२ दिवसांत तयार केला आहे. या चरख्याची नोंद गिनेस आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रस्ताव सादर केल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिली आहे. चरख्याच्या निर्मितीकरिता वापरण्यात आलेले साहित्य मुंबई येथील  आहे. यात साडेपाच टन धातू आणि लोखंड आहे. महाविद्यालयाच्या तीन शाखेतील तब्बल १७ विद्यार्थ्यांना घेऊन हा चरखा तयार करण्यात आला आहे. हा चरखा दोन अश्‍वशक्‍तीच्या मोटरने फिरणार आहे. सोबतच त्यावर एलईडी दिवे लावून गांधीजींचे आवडते भजन ‘वैष्णव जण तो…’  हे पर्यटकांना ऐकाला मिळणार आहे.

या चरख्याची उंची १८.६ फूट असून रुंदी ११.४ आणि त्याची लांबी ३१ फूट आहे. हा चरखा बनविण्याची जबाबदारी देशात एकमात्र असलेल्या या महाविद्यालयाला मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाविद्यालय असोसिएशनचे आर्किटेक अडारकर यांनी सोपविली आहे.

चरखा जरी लोखंडापासून बनला असला तरी तो पर्यटकांना लाकडाचा असल्याचे भासणार आहे. त्यावर रंग हा लाकडाचा वापरण्यात येणार असून त्याची बनावट तशी असल्याची माहिती प्रा. खैरनार यांनी दिली. चरखा बनविण्यासाठी प्रा.विजय सपकाळ, प्रा. श्रीकांत खैरनार, प्रा. विजय बोदरे, विद्यार्थी पंकज जाधव, अक्षय गंगे, आदित्य मोरे, समीम खान, फेब्रिकेशन  विभागाचे दिनेश परमार, रुचिता, कॅमेरा शिद्देश कुरापाने,ओंकार कोतवाल, ड्रोन अनिकेत कस्तुरे यांनी परिश्रम घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत