सोलनपाडा डँमच्या पायथ्याशी अनधिकृत विहिरीचे उत्खनन, रायगडचे जिल्हाधिकारी यांनी अखेर वादग्रस्त विहिरीची केली पाहणी

विहिरीचे काम अधिकृत कि अनधिकृत यावर प्रशासकीय अधिकारी गप्प? 

लघु पाठबंधारे विभाग, ग्रामपंचायतीची परवानगी नसताना काम झाले कसे ?

सोलनपाडा डँमच्या पायथ्याशी अनधिकृत विहिरीचे उत्खनन

नेरळ : कांता हाबळे

कर्जत तालुक्यातील ठेंबरे ग्रामपंचायत हद्दीतील सोलनपाडा डँम हे गेल्या तीन-चार वर्षापासून पर्यटकांसाठी पर्वणीच ठरले आहे. परंतु, येथे मुंबई येथील धनिकाने आपल्या वयक्तीक स्वार्थासाठी डँमच्या पायथ्याशी ब्लास्टींगकरुन नविन विहिरीचे खोदकाम  केले आहे. अनेक वेळा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचा विरोध होऊन सुद्धा काम झाले. अखेर या प्रकरणाची दखल घेत स्वःता रायगडचे जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यामुळे लवकरच यावर मार्ग निघेल अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनाही व्यक्त केली. 
येथील नैसर्गिक स्त्रोत बंद होऊन या परिसरातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार कि, काय असा सवाल उपस्थित राहिला आहे. तर जिल्हा परिषदेच्या लघुपाठबंधारे विभाग आणि ग्रामपंचायत यांची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन डँमच्या पायथ्याशी ब्लास्टिंग करुन पाडलेली विहिर मातीने भरुन तात्काळ  पुर्वरत करण्यात यावी असे जिल्हा परिषद सदस्या रेखा भास्कर दिसले यांनी आपले मत व्यक्त केले. त्याप्रसंगीपं. समिती सदस्या जयंती हिंदोळा, सरपंच दिपाली प्रमोद पिंगळे,भास्कर दिसले, प्रमोद पिंगळे, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
टेंभरे ग्रामपंचायतमधील रजपे, जामरुंग, हिरेवाडी, कामतपाडा ,ठेंभरे आदी गावांतील नागरीकांचा या विहिरीच्या कामाला प्रचंड विरोध असून सुद्धा काम झाले हेच मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे यामागे नक्की कुणाचा हात आहे हे येणारा काळच सांगणार आहे. यापूर्वीही लघु पाठबंधारे विभागाचे उप अभियंता दगडू कांबळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
टेंभरे ग्रामपंचायत हद्दीतील सोलनपाडा डँम परिसरात विजयसिंह पडोडे या धनिक गृहस्थाने १५० ते २०० एकर जमीन खरेदी केली आहे. त्याने आपल्या जमिनीवर मोठे शैक्षणिक संकुल उभे करण्याचा मानस आखला असून त्यादृष्टीने काम सुद्धा सुरु आहे. त्यामुळे भविष्यात तिथे लागणारा पाणीसाठा मोठ्याप्रमाणात उपलब्ध व्हावा म्हणून चक्क सोनलपाडा डँमच्या पायथ्याशीच ब्लास्टींगकरुन विहिरिचे खोदकाम केले.
ग्रामस्थांनी आपला विरोध हा काँलेजच्या कामाला नसुन डँमच्या पायथ्याशी झालेल्या विहिरीला आहे असे अनेक वेळा ठणकावून सांगितले. त्यासाठी  पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभाग, तहसील कार्यालय आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देऊन हे काम तात्काळ बंद करुन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी  केली. परंतु, पडोडे यांनी न जुमानता विहिरीचे काम केले. त्यामुळे आता संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्व कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत