सोशल मीडियावर चर्चा, सप्टेंबरच्या पूर्वार्धात ६ दिवस बँका बंद?

नवी दिल्‍ली : रायगड माझा वृत्त 

Related image

गेल्या काही दिवसांपासून व्हॉटस् अ‍ॅपसह इतर सोशल मीडियावर स्पटेंबरच्या पूर्वाधात तब्बल 6 दिवस बँका बंद राहतील, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, ही अफवा असून बहुतांश बँका सुरु राहतील, एटीएम केंद्रावरही काही परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण काही बँक अधिकार्‍यांनी दिले आहे.

याबाबत राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटना उपाध्यक्षा अश्‍वनी राणा यांनी सांगितले की, व्हॉटस् अ‍ॅपसह इतर काही सोशल मीडियावर सप्टेंबरच्या पहिल्या काही दिवसांत 6 दिवस बँका बंद असतील, अशी चर्चा आहे. 2 ते 5 सप्टेंबर आणि विकेंडनिमित्त 8 आणि 9 सप्टेंबर अशा 6 दिवशी बँका बंद राहतील, अशी चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, त्यात तथ्य नसून ही अफवा आहे, असे सांगण्यात आले. बँकिंग क्षेत्राचा विचार करता या महिन्याचे व्यवहार सोमवार, 3 सप्टेंबरला सुरु होणे अपेक्षित असले तरी या दिवशी जन्माष्टमी आहे. तर त्यानंतर बँक कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्मचार्‍यांनी 4 आणि 5 सप्टेंबर रोजी संपाचे आवाहन केले आहे. मात्र, सर्वच बँक कर्मचारी या दोन दिवशी संप करतील, असा गैरसमज यातून पसरला आहे.

अश्‍वनी राणा यांच्या माहितीनुसार, हा संप केवळ रिझर्व्ह बँकेच्या कर्मचार्‍यांनी पुकारला आहे. वास्तविक ते संपावर जाणार नसून एकत्रित सुटी घेणार आहेत. भविष्य निर्वाह निधी, पेन्शन संदर्भातील मागण्यांसाठी त्यांनी असा निर्णय घेतला आहे. मात्र, याचा फारसा परिणाम सरकारी आणि खासगी बँकांच्या दैनंदिन व्यवहारांवर होणार नाही. बँक अधिकार्‍यांच्या खुलाशामुळे विशेषत: व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई, दिल्‍लीतील बँका सुरू राहणार…

3 सप्टेंबरला जन्माष्टमी असली तरी मुंबईसह दिल्‍लीतील बँका सुरु राहणार आहेत. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये बँकांना निगोशिएबल इन्स्ट्रूमेंड अ‍ॅक्टनुसार सुटी असेल. असे असले तरी ऑनलाईन बँक व्यवहारांवर त्याचा काही परिणाम होणार नाही. तसेच एटीएम केंद्रातील रोख उपलब्धतेवरही काही परिणाम होणार नाही, अशी माहिती एचडीएफसी बँकेच्या अधिकार्‍यांनी दिली. तर रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, या बँकेची देशभरात 31 विभागीय आणि उपकार्यालये आहेत. यापैकी 16 कार्यालये जन्माष्टमीनिमित्त 3 सप्टेंबर रोजी बंद राहतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत