सौभाग्य योजनेतील वीज मोफत नाही : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या सौभाग्य योजनेअंतर्गत कोणत्याही वर्गातील ग्राहकाला मोफत वीज मिळणार नाही, असे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. केवळ वीजजोडणी मोफत असणार आहे. वीजेपासून वंचित कुटुंबांना वीजपुरवठा करण्यासाठी मोदींनी ही योजना सुरु केली.

देशातील सर्व घरांना वीजपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य योजना आणली असून, डिसेंबर २०१८ पर्यंत सर्व घरांत वीज पोहोचवण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. याबाबत उर्जा मंत्रालयाने बुधवारी माहितीपत्रक जारी केले. या योजनेअंतर्गत मोफत वीज मिळणार नाही. तर गरीब कुटुंबांना वीज जोडणी मोफत दिली जाईल, असे यात म्हटले आहे. अन्य वर्गातील ग्राहकांना वीज जोडणीसाठी फक्त ५०० रुपये मोजावे लागतील. हे पैसे वीज वितरण करणाऱ्या कंपनीमार्फत १० हप्त्यांमध्ये वसूल केले जातील.

‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ अंतर्गत देशातील ४ कोटी कुटुंबांना वीज पुरवठा केला जाणार आहे. ४ कोटी ग्राहकांची भर पडणार असल्याने देशातील वीजेची मागणी २८ हजार मेगावॉटने वाढणार आहे

योजनेअंतर्गत कोणत्याही वर्गातील ग्राहकांना मोफत वीज देण्याची तरतूद नाही. विजेचे बिल हे संबंधित ग्राहकालाच भरावे लागेल आणि यासाठी संबंधित वीजवितरण करणाऱ्या विभागाच्या किंवा कंपनीच्या दरानुसारच वीज बिल आकारले जाईल असे माहितीपत्रात म्हटले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी २५ कोटी कुटुंबांपैकी पैकी चार कोटी घरांत अद्याप वीज पोहोचलेली नाही. या घरातील मुलांना मातीच्या दिव्यांच्या उजेडात अभ्यास करावा लागतो. सौभाग्य योजनेअंतर्गत देशातील सर्व उत्सुक कुटुंबांना मोफत वीजजोडणी करुन देण्यात येईल, असे मोदींनी सोमवारी म्हटले होते. या योजनेसाठी १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च होणार असून, यातील १२ हजार ३२० कोटी रुपये अर्थसंकल्पातून तरतूद करुन देण्यात येणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत