स्वतंत्र कोकण राज्याची मागणी

कणकवली : रायगड माझा वृत्त

कोकणी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र कोकण राज्य निर्माण होणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रा. महेंद्र नाटेकर यांनी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे केली.

स्वतंत्र कोकण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नाटेकर यांनी चिपळूण येथे जाऊन सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. यावेळी स्वतंत्र कोकण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मोतीराम गोठिवरेकर, कार्याध्यक्ष ए. आय. चिलवान, उत्तम म्हापसेकर आदी उपस्थित होते.

नाटेकर यांनी पत्रकात म्हटले की, कोकणात जागतिक दर्जाची बंदरे आहेत. पण, त्यांचा विकास झालेला नाही. तर दीडशे इंच पाऊस पडूनही छोट्या मोठ्या धरणांची कामे पूर्ण केलेली नाहीत. परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्स कोकण हद्दीमधील मत्स्यसंपदा लुटून नेत आहेत. याखेरीज अणुऊर्जा, रिफायनरी, तसेच खाण उत्खनन असे कोकणचा नाश करणारे प्रकल्प येत आहेत. याबाबतची माहिती महाजन यांना देण्यात आली.

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकणच्या सहा जिल्ह्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण होणे आवश्‍यक आहे. तरच कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण होईल. धरणे बांधून कोकण सुजलाम सुफलाम करता येईल. कोकणातील प्रत्येक बेरोजगाला हक्‍काची नोकरी मिळेल. छोटी राज्ये निर्माण करण्याची संकल्पना ही भाजपची आहे. त्यामुळे स्वतंत्र कोकण राज्यासाठीही विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी सुमित्रा महाजन यांचेकडे केली असल्याचे नाटेकर यांनी म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत