स्वयंपाकाला उशीर; सासू सुनेला करकचून चावली

बरेली : रायगड माझा ऑनलाईन

सासू-सुनेचं विळ्या-भोपळ्याचं नातं सगळ्यांनाच ठाऊक आहे. घरात एकत्र नांदताना या दोघींमध्ये शाब्दिक वाद झालेले आपण पाहिलेत. काही घरांमध्ये तर आजही हे वाद संपलेले नाहीत. उत्तर प्रदेशातील हरगोविंदनगरमध्ये एक अशीच विचित्र घटना शनिवारी रात्री घडली. स्वयंपाक वेळेत झाला नाही म्हणून दोघींमध्ये भांडण झालं आणि रागारागात सासू सुनेच्या हाताच्या बोटांना चावली आणि पसार झाली.

सुनेनं केलेल्या तक्रारीनुसार, ‘३२ वर्षीय प्रीती भारती ही आपल्या बाळाला स्तनपान करत होती. त्याचवेळी तिला सासू सुशिला देवी (वय ६५) हिनं स्वयंपाक करण्यास सांगितलं. पण बाळाला स्तनपान केल्यानंतर स्वयंपाक करते, असं उत्तर प्रीतीनं सासूला दिलं. यावरून सासू चिडली आणि ती प्रीतीच्या उजव्या हाताच्या बोटांना चावली.’

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण तोपर्यंत सासू तेथून पसार झाली होती. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रीतीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिच्या हाताच्या बोटांना चावा घेतल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत