स्वसंरक्षणार्थ कारवाई केली, शांतीपूर्ण चर्चेसाठी आजही तयार : इम्रान खान

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त करत पुलवामा हल्ल्याचं उत्तर दिलं. पाकिस्तानला गाफील ठेवत भारताने केलेल्या या हल्ल्याचे पडसाद दूरवर उमटल्याचं पाहायला मिळालं ज्यानंतर पाकिस्तानकडूनही एअर स्ट्राईकच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय हवाई सीमा ओलांडत घुसखोर करण्याचा प्रयत्न केला गेला. याचसंबंधीची आपल्या राष्ट्राची भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही भारताला या हल्ल्याची चौकशी करण्याची मोकळीक दिली होती असं म्हणत आम्ही आजही चर्चेसाठी तयार असल्याचीच बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली. दहशतवादासाठी आपल्या देशाचील भूमी वापरली जावी असं आम्हालाही वाटत नाही त्यामुळे चर्चेसाठी आम्ही आजही तयार आहोत असं खान म्हणाले. भारताने केलेल्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर त्याविषयीची माहिती मिळाल्यानंतरच स्वसंरक्षणार्थ पाकिस्तानी सैन्याने ही कारवाई केल्याचं इम्रान खान यांनी स्पष्ट केलं.

भारतीय हवाई सीमा ओलांडत आपण फक्तच उत्तर देण्यासाठी तयार असल्याचं दर्शवू इच्छित होतो असंही ते म्हणाले. या कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवण्यात आलेली नाही आणि तसा उद्देशही नव्हता; असं म्हणत खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांतीपूर्ण मार्गाने चर्चा करत या मुद्दयावर तोडगा काढण्याची विनंती केली. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि इतर युद्धांचा संदर्भ देत खान यांनी युद्धाने कधीच कोणाचं भलं झालेलं नाही हा मुद्दा मांडत पुन्हा एकदा युद्ध नसल्याचं आपलं मत माध्यमांसमोर मांडलं.

एकीकडे भारताच्या एअर स्ट्राईकनंतर या हल्ल्याचं उत्तर देणार असल्याचा आणि पाकिस्तानातील जनतेला, सैन्याला येत्या काही दिवसांसाठी कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार राहण्याची भाषा करणाऱ्या खान यांचा सूर आता नरमला आहे, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी देण्यास सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे खान यांनी शांतीपूर्ण चर्चेसाठी केलेल्या या विनंतीचा भारताकडून स्वीकार केला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत