हरभजनचा विश्वविक्रम आफ्रिकेच्या रबाडाने मोडला

कोलंबो : रायगड माझा वृत्त :

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडाने गले येथे सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ७ बळी घेत आपल्या नावावर विश्वविक्रमाची नोंद केली आहे. याबरोबरच त्याने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचा विक्रम मोडला. रबाडाने कसोटीतील १५०वा  बळी घेत विश्वविक्रम केला.

रबाडाने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात दिलरुवान परेराला पायचित केले. कसोटी क्रिकेटमधीला हा त्याचा १५० वा बळी ठरला. यामुळे जगातील सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेटमध्ये १५० बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचे वय २३ वर्ष आणि दोन महिने  इतके आहे. यापूर्वी हरभजनच्या नावावर हा विक्रम होता. २००३ मध्ये २३ वर्ष चार महिने वय असताना हरभजनने १५० कसोटी बळींची संख्या गाठली होती.

यापूर्वी रबाडाने ४८ कसोटी सामन्यांमध्ये २१.५९च्या सरासरीने १४३ बळी घेतले होते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात  त्याने पहिल्या डावामध्ये ५० धावात ४ बळी घेतले होते. तर दुसऱ्या डावात ३ बळी घेत १५० कसोटी बळी पूर्ण केले.

आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या रबाडाने गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एकदिवसीय क्रमवारीतही रबाडा ७व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार समारंभातदेखील त्यानेच बाजी मारली होती. यात त्याने ९ पैकी ६ पुरस्कार पटकावले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत