हार्बर मार्गावरील टवाळखोर अखेर पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये माकडचाळे करून आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असाच एक प्रकार हार्बर मार्गावर रविवारी (29 जुलै) उघडकीस आला. चार टवाळखोर तरुणांचा प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला होता. हार्बर मार्गावर स्टंटबाजी करणारे हे चार हुल्लडबाज अखेर पोलिसांच्या हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (1 ऑगस्ट) मध्यरात्री वडाळा लोहमार्ग पोलिसांनी या टवाळखोरांना ताब्यात घेतलं.

मोहम्मद अली शेख (वय 19), रोहित चौरसिया (वय 20), मोहम्मद शेख उर्फ (जावेद) (वय 20) आणि शहबाज खान (वय 18) अशी या टवाळखोर स्टंटबाजांची नावे आहेत. तर जावेदने स्टंट करताना जीटीबी स्थानकातील प्रवाशाचा मोबाईल देखील हिसकावून चोरला असल्याचे कबूल केले आहे. याच्यावर लोहमार्ग पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना रेल्वे न्यायालयात आज (ता. 2) हजर करण्यात येणार असल्याची माहिती वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी दिली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (29 जुलै) दुपारच्या सुमारास हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानक आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यानच्या प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आला होता. या टपोरी मुलांना अद्दल घडविण्यासाठी पोलिसांनी जर कोणास हि मुलं दिसली तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानूसार या चार हुल्लडबाज तरुणांना पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ स्टंट करणाऱ्यांपैकीच एकाने सेल्फी कॅमेराने शूट केलेला आहे. यामध्ये चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढताना दिसत होता. तर इतर मुलं दरवाजाला आणि खिडकीला लटकल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते. या हुल्लडबाजांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावल्याचेही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते.

व्हिडिओमध्ये जीटीबी स्थानकात या चौघांपैकी एकजण उतरलेला दिसतो. तसेच ट्रेन सुरु झाल्यावर ती वेग पकडू लागते तसा काळ्या टी-शर्टमधील हा तरुण धावू लागतो. त्याच वेळी त्याच्या टोळीतील एकजण दरवाजाला लटकून बाहेर झेपावत प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतो. हा संपूर्ण घटनाक्रमही या व्हिडिओत कैद झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता या चौघांवर कारवाई केली आहे.

बातमीचा व्हिडीओ :

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत