हार्मोनियमवादक ‘पद्मश्री’ पंडित तुळशीदास बोरकर यांचं निधन

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Related image

आपल्या बोटांच्या जादुई स्पर्शानं हार्मोनियमला अक्षरश: बोलायला लावणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियमवादक ‘पद्मश्री’ पंडित तुळशीदास बोरकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं सोलो हार्मोनियम वादनाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा व्रतस्थ कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पंडित तुळशीदास बोरकर यांना काही महिन्यांपूर्वी हार्नियाचा त्रास झाला होता. त्यावर शस्त्रक्रिया होऊन ते घरीही परतले होते. परंतु पंधरा दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यामुळं त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना टीबीचा विकार जडल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. त्या आजारावरही उपचार सुरू होते. मात्र, वयोमानामुळं त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आज अखेर त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे.

संगीत कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यातील बोरी या गावात जन्मलेले तुळशीदास बोरकर लहानपणीच गोवा सोडून पुण्यात आले. ते गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी रोज पुणे-मुंबई ये-जा करत. त्यांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, राजन-साजन मिश्रा आदी कलावंतांना साथ केली. बोरकर यांनी आपल्या हार्मोनियम वादनानं केवळ शास्त्रीय संगीताच्या रसिकांना आनंदच दिला नाही, तर ते अखेरपर्यंत ज्ञानदान करत राहिले. त्यांनी अनेक शिष्योत्तम घडवले. बोरकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे तंत्र शिकलेले अनेक शिष्य आज स्वतंत्रपणे शास्त्रीय संगीताचा प्रसार करत आहेत. हार्मोनियमबरोबरच ऑर्गनवरही त्यांचं प्रभुत्व होतं. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१६ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत