‘हा’ आहे भाजपचा 2019 साठीचा मेगा प्लान

नवी दिल्ली: रायगड माझा 

देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपा यामध्ये सर्वात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. कारण दिल्लीत ‘फिर एक बार मोदी सरकार’ आणण्यासाठी भाजपाचे नेतृत्त्व कामाला लागले आहे. पुन्हा एकदा दिल्ली जिंकण्यासाठी भाजपाने देशातील सर्वच्या सर्व म्हणजेच 543 जागांसाठी मेगा प्लान तयार केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. या प्रत्येक जागेसाठी भाजपा एक प्रभारी नियुक्त करणार आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघासाठी प्रभारींची नियुक्ती होईल, ते प्रभारी त्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे असतील. याशिवाय प्रत्येक राज्यात 11 सदस्यांची एक ‘इलेक्शन टीम’ असेल. ही टीम 13 विशिष्ट मुद्यांवर लक्ष देईल. एका इंग्रजी वर्तमानपत्राने भाजपाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याबद्दलचे वृत्त दिले आहे. भाजपा अशाप्रकारे पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघामागे एका प्रभारी नेमणार आहे. बहुजन समाज पक्ष कित्येक वर्षांपासून या पद्धतीने निवडणुकीची योजना आखतो आहे.

मोदी-शहा जोडगोळीला 2019 ची लोकसभा निवडणूक 2014 पेक्षा मोठ्या फरकाने जिंकायची असल्याचे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. ‘मोदी-शहा संघटनेवर जास्त भर देत आहेत. 2019 च्या पार्श्वभूमीवर मोदी-शहांनी ही सर्व तयारी सुरू केली आहे,’ अशी माहिती या नेत्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेतृत्त्वाने प्रत्येक राज्यातील भाजपा संघटनेला विविध सामाजिक मुद्यांवर आधारित अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. याशिवाय सध्याची राजकीय परिस्थिती, विरोधकांची रणनिती, आघाडीच्या शक्यता, सरकारी योजनांच्या लाभार्थींची यादी अशा विविध मुद्यांची माहितीदेखील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मागवली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत