हिंसाचाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार : भीमा कोरेगावच्या ग्रामस्थांचा आरोप

पुणे : भीमा कोरेगावमध्ये यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नव्हता. संपूर्ण गाव एकत्र नांदत आहे. आम्ही आधीही एकत्र होतो आणि यापुढेही एकत्र राहू. गावात घडलेला प्रकार बाहेरच्या व्यक्तींकडून झालाय, असा आरोप कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी केला आहे.
भीमा कोरेगावच्या ग्रामस्थांनीही सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावातील दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला. 1 जानेवारीला कोरेगाव-भीमा गावात दलित बांधव विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात गावातील दुकानं फोडली, गाड्यांची तोडफोड केली, लहान मुलं-महिलांनाही त्रास झाला. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा. तसेच गावात झालेल्या तोडफोडीमध्ये ज्यांचं नुकसान झालं, त्यांचे पंचनामे करुन सरकारने मदत करावी, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.
आज जगभर आमच्या गावाची बदनामी झाली आहे. तसेच गावावर गेले तीन दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही. मात्र, सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही. 31 डिसेंबरला रामदास आठवले आणि पालकमंत्र्यांनी इथे येऊन पाहणी केली होती. पण त्यानंतर एकही नेता इथे फिरकला नाही, असा संतापही ग्रामस्थांनी व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी गावातील हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. ही हत्या होणं क्लेशदायी असून सरकारने राहुल फटांगडेच्या कुटुंबाला एक कोटींची मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, भीमा कोरेगावाची बदनामी थांबवावी आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचं ग्रामस्थ म्हणाले. तसंच दलित आणि मराठा समाजाने शांतता राखावी, असं आवाहनही गावकऱ्यांनी केलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत