हिना गावीत यांच्या गाडी हल्ला प्रकरणात 18 मराठा आंदोलक स्वतःहून पोलिसात हजर

धुळे : रायगड माझा वृत्त

 खासदार डॉ. हिना गावीत यांच्या गाडीच्या झालेल्या तोडफोडीबद्दल मराठा क्रांती मोर्चाने जाहीर माफी मागत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावर आज या हल्ल्याप्रकरणात आरोप असलेले 18 मराठा आंदोलक स्वतःहून पोलिसात हजर झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात एकूण 2 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान,  मी आदिवासी समाजातून आलेली खासदार आहे म्हणून काल धुळ्यात मराठा आंदोलनाकांनी माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली होती, त्यावर सर्व आरोपींवर जीवे मारण्यासह अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खासदार हिना गावीत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पण असं असतानाही मराठा क्रांती मोर्चाचं धुळ्यातील आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान घडलेली घटना पूर्वनियोजित असल्याचा खासदार हिना गावीत यांचा आरोप चुकीचा आहे. खासदार हिना गावीत यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. डाॅ गावित यांच्या गाडीची तोडफोड करण्यामागे  कुठलाही हेतू नसून अनवधानाने हे घडलं असल्याच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी स्पष्ट केलं होतं.

झालेली घटना ही निंदनीय असून मराठा कार्यकर्त्यानी केलेल्या या कृत्याचा मराठा क्रांती मोर्चा समर्थन करणार नाही असं स्पष्ट करतांना आरक्षण मिळत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा संकल्प मराठा क्रांती मोर्चाचे धुळे जिल्हा समन्वयक मनोज मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान घटनेच निमित्त करून मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये असंही ते त्यावेळी म्हणाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत