….ही आहेत मुंबईतील मोबाईल चोर स्थानके!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

सध्या लोकल ट्रेन प्रवासात मोबाईल चोरी होण्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. रेल्वे पोलिसांकडे रोज मोबाईल चोरीला जाण्याच्या तक्रारी येत आहेत. यात पश्चिम रेल्वे अग्रस्थानी आहे. पश्चिम रेल्वेवरील तीन महत्त्वाच्या स्थानकांमध्ये वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे प्रवाशांनी या स्थानकांचं नामकरण मोबाईल चोर असं केलं आहे.

पश्चिम रेल्वेवरील बोरीवली, अंधेरी आणि वांद्रे ही तीन स्थानकं सध्या मोबाईल चोरांची राजधानीची स्थानक झाली आहेत. या स्थानकांवर रोज सरासरी १० मोबाईल चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. जानेवारी ते जून २०१८मध्ये या तिन्ही स्थानकांवर मोबाईल चोरीच्या ७७२० तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या स्थानकांच्या येण्याची घोषणा झाल्यानंतर प्रवासी उत्स्फूर्तपणे मोबाईल चोर स्थानकं आली, असा उपहास करताना दिसत आहेत.

या तक्रारींपैकी फक्त १३३ तक्रारींचं निवारण करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. यात अंधेरी स्थानकातील १८२५ तक्रारींपैकी २५ तक्रारी, बोरीवली स्थानकातील १४२९ तक्रारींपैकी २० तक्रारी आणि वांद्रे येथील १४६१ तक्रारींपैकी १० तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत.

दाखल होणाऱ्या तक्रारींच्या तुलनेने प्रकरणं सोडवण्याचं प्रमाण कमी असल्याने प्रवासी रेल्वे पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नाराज आहेत. रेल्वेत गर्दीच्या वेळी मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या, स्थानकांजवळ उभं राहून मोबाईल हातातून हिसकावून घेणं असे प्रकार पोलिसांना माहीत असूनही रेल्वे पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे आता या स्थानकांजवळ ट्रेन आली की, प्रवासी सतर्क होताना दिसत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत