हुसेन दलवाई मला तीन वेळा सॉरी म्हणाले : सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

दापोली : रायगड माझा वृत्त

रायगड लोकसभेसाठी माझ्या उमेदवारीला काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांचा असलेला विरोध हा वैयक्तिक आहे. महाड येथील खा.हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यानंतर मी त्यांना फोन करून वस्तुस्थिती लक्षात आणुन दिली. ते तीन वेळा मला सॉरी म्हणाले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी केला. ते दापोलीत पत्रकारांशी बोलत होते.

बुधवारी ५ डिसेंबर रोजी पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्या दापोली दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर तटकरे दापोलीत आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.

… तर काँग्रेस जिंकते तिथे आमचीही ताकद आहे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आघाडी अथवा जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे खा.हुसेन दलवाई यांनी महाड येथे माझ्या व खासदार नारायणराव राणे साहेबांच्या मैत्रीवरून लोकसभा जागेबाबत केलेले वक्तव्य हे माझ्या विरोधात नाही, तर काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याच विरोधात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे स्पष्ट मत तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले. जर का दलवाई असे वक्तव्य करत असतील तर काँग्रेस नेते ज्या ठिकाणी निवडुन येतात त्या ठिकाणी आमची राष्ट्रवादीची ताकद असल्याची आठवणही तटकरे यांनी करून दिली.

दलवाईंची टीका द्वेषापोटी

ते पुढे म्हणाले की,रत्नागिरी लोकसभेबाबत खा.हुसेन दलवार्इंनी चुकीच्या माहिती आधारे वक्तव्य केलेले आहे. ही जागा राष्ट्रवादीला देण्यासाठी काँग्रेसचेच खा.अशोकराव चव्हाण,विखे पाटिल आदी नेते आग्रही होते. मात्र आमची ताकद माहिती असल्याने यावर आपण कोणतेही वक्तव्य त्यावेळी केलेले नव्हते. तरीही दलवाई वैयक्तिक व्देषापोटी चुकीची वक्तव्य करत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी व्हावी असे माझे मत आहे, असे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत