हेल्मेटसक्ती : कागद आणि पुठ्‌ठ्याचे हेल्मेट घालून पुणेरी स्टाईलने विरोध

पुणे : रायगड माझा ऑनलाईन 

नियम कोणताही असूद्या हो…तो पाळायचा की नाही…. हे आम्ही ठरणार अशा अर्विभावात पुणेकरांनी गुरुवारी (दि.३) हेल्मेटसक्तीला विरोध केला. पत्रकार भवनापासून सकाळी साडेदहाच्या सुमारास शेकडो दुचाकीस्वार हेल्मेटसक्ती विरोधात घोषणा देत रॅलीत सहभागी झाले होते. विशेषतः दुचाकीस्वारांनी पुणेरी पगड्या घालत अनोखे आंदोलन करत हेल्मेटसक्तीचा विरोध केला.

शहरात मागील दोन दिवसांपासून पोलिसांकडून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, पदाधिकारी, संघटनेच्या हेल्मेट विरोधी कृती समितीने निर्णयास विरोध करत पोलिस आयुक्त कार्यालयावर दुचाकी रॅली काढली. त्या रॅलीत दुचाकीस्वारांनी पुणेरी पगडी घालत हेल्मेटसक्तीचा गांधीगिरीने निषेध केला. हेल्मेट हटाव कारवाई बचाव, नही चलेगी नही चलेगी हेल्मेटसक्ती नही चलेगी, हेल्मेट उत्पादकांचे हित साधणार्‍या पोलिसांचा धिक्कार असो अशा आशयाचे फलक हातात घेत दुचाकीस्वारांनी हेल्मेटसक्तीचा विरोध केला.

हेल्मेटसक्तीची अशीही गांधीगिरी

विना हेल्मेट प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांवर वाहतूक कर्मचार्‍यांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे हेल्मेटसक्तीचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात अनेक दुचाकीस्वारांनी कागद आणि पुठ्‌ठ्याचे हेल्मेट डोक्यावर घातले होते. तर या रॅलीत दुचाकीस्वारांनी हेल्मेटसक्ती विरोधात जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.

दोन दिवसांत १५ हजार दुचाकीस्वारांवर कारवाई

वाहतूक विभागाने नववर्षांच्या पहिल्याच दिवसापासून विना हेल्मेट प्रवास करणार्‍या दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमााणावर कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसांत १५ हजारांवर विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण सीसीटीव्हीच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत