रायगड माझा ऑनलाईन l अलिबाग
फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. सर्वत्र होळीचा जल्लोष चालू होता, मात्र अलिबाग तालुक्याच्या खारेपाटीतील शहापूर गावातील अमरनाथ भगत, रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील हे बहाद्दर ग्रामस्थ शेतकरी मध्यरात्री अडीच वाजता गावाजवळच्या भंगारकोठा समुद्र संरक्षक बंधा-यास समुद्र उधाणामुळे पडत असलेली भगदाडे बुजवण्यासाठी किर्र अंधारात बॅटरीच्या प्रकाशात धडपडत होते. त्यांचे लक्ष एकच होते, शांतपणे झोपलेल्या गावात समुद्राच्या लाटांचे पाणी घुसू द्यायचे नाही आणि गाव वाचवायचे. रात्री अडीच ते पहाटे साडेपाच अशा तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांना शेवटी यश आले. उगवत्या सूर्याच्या किरणांबरोबर गावात या सहा जणांच्या धाडसाचे वृत्त पसरले आणि काहींनी त्यांना डोक्यावर घेतले तर काहींच्या डोळ्यात अश्रू तराळले.
…ग्रामस्थ झोपी गेले होते
शुक्रवारी रात्री होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळीच्या होमात जुन्या अविचारांना भस्मसात करुन शाहापूरकर ग्रामस्थ आपापल्या घरी झोपी गेले होते. तसे हे बहाद्दर सहा जण देखील रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपापल्या घरी पोहोचले होते. गेल्या सहा ते आठ अमावास्या आणि पौर्णिमेला गावाच्या किना-यावरील समुद्र संरक्षक बंधा-यांना उधाणाच्या भरतीमुळे मोठी भगदाडे पडून समुद्र भरतीचे पाणी गावाच्या वस्तीपर्यंत पोहोचले होते. त्यावर मात करण्याकरीता हे सर्व समुद्र संरक्षक बंधारे श्रमदानातून दुरुस्त करण्याचा निर्णय गावकीने घेतला. सलग पाच दिवस गावांतील किमान 600 ग्रामस्थ स्त्री-पुरुष शेतक-यांनी दररोज अथक श्रमदान करुन हे बंधारे बांधून काढून आपले गाव सुरक्षित केले होते.